‘एटीएम’मधील चोरीत होतोय तंत्रज्ञानाचा वापर

ATM-Theft
ATM-Theft

पुणे - शहरातील वेगवेगळ्या भागांतील एटीएममध्ये तांत्रिक बिघाड करून लाखो रुपये काढून घेतले जात आहेत. एटीएममध्ये पैसे भरल्याचे भासवून बॅंकांकडून पैसे उकळण्याच्या घटना घडत आहेत. यामध्ये गुन्हे शाखेच्या पोलिसांनी काही जणांना अटक केली आहे. अशा पद्धतीच्या ‘एटीएम फ्रॉड’मध्ये परराज्यातील टोळी सक्रिय झाल्याची शक्‍यता आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शहराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये २६ सप्टेंबरपासून ते २४ ऑक्‍टोबरपर्यंतच्या कालावधीमध्ये ‘एटीएम फ्रॉड’चे प्रकार घडले आहेत. धनकवडी व सदाशिव पेठेत येथे घडलेल्या दोन्ही घटना सारख्याच आहेत. एटीएममध्ये घुसलेल्या व्यक्तींकडून एटीएमचे अप्पर डिस्प्ले हूड काढून इंटरनेट बंद करत लाखो रुपयांची रक्कम चोरली. त्याचवेळी स्टेट बॅंकेच्या एटीएममध्ये पैसे भरण्याचा बहाणा करून प्रत्यक्षात पैसे न भरता संबंधित व्यवहार अपूर्ण राहिल्याचे सांगत आरोपींनी बॅंकेकडून पैसे उकळले आहेत.

‘एटीएम फ्रॉड’ करणाऱ्या गुन्हेगारांकडून सराईतपणे एटीएममध्ये तांत्रिक बिघाड करून पैसे काढून घेणे किंवा वेगळीच शक्कल लढवत बॅंकेची फसवणूक करण्याचे तंत्र अवलंबिले जात आहे. या पद्धतीचे गुन्हे शहरात कुठे कुठे घडले आहेत का, याचाही शोध पोलिस घेत आहेत. त्यादृष्टीने गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पथकाने स्टेट बॅंकेच्या फसवणूकप्रकरणी तिघांना अटक केली आहे.

डेबिट कार्डचे ‘कानपूर कनेक्‍शन’
गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींनी विविध व्यक्तींच्या नावावर असलेल्या डेबिट कार्डचा वापर करून बॅंकेची फसवणूक केली आहे. मात्र, आरोपींकडे डेबिट कार्ड येतात कुठून, त्यांचा इतर कोणाशी संपर्क आहे का, ते कार्ड कोणाचे आहेत आणि त्याचा फसवणुकीसाठी कसा वापर केला जात आहे, याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. त्यामध्ये अटक केलेल्या आरोपींचे उत्तर प्रदेशातील कानपूरचे कनेक्‍शन असल्याची माहिती पुढे येत आहेत.

‘एटीएम फ्रॉड’चा एक गुन्हा उघडकीस आणला आहे. त्यातून अन्य गुन्हेही उघड होऊ शकतील. मात्र, असे गुन्हे करणाऱ्या व्यक्तींना एटीएम यंत्रणा, संगणक प्रणाली, बॅंकिंग व्यवस्थेची माहिती असण्याची शक्‍यता नाकारता येत नाही किंवा त्याबाबत कोणाकडून तरी त्यांना गुन्हा करण्याची माहिती मिळू शकते. त्यातूनच असे प्रकार घडत आहेत. या घटनांच्या मुळाशी जाऊन तपास करण्याचे काम पोलिस करीत आहेत.
- बच्चन सिंह, पोलिस उपायुक्त, गुन्हे

घटना क्रमांक १ : कॅनरा बॅंकेच्या धनकवडीतील एटीएम केंद्रात २६ ते २९ सप्टेंबर या कालावधीमध्ये तीन व्यक्ती आल्या होत्या. त्यांनी एटीएम मशिनचे डिस्प्ले हूड काढले, मशिनची इंटरनेट सेवा बंद करत चोरट्यांनी पाच लाख ६६ हजार रुपये काढून घेत बॅंकेची फसवणूक केली. 

घटना क्रमांक २ : कॅनरा बॅंकेच्याच सदाशिव पेठेतील विजयनगर येथील एटीएममध्ये ११ व १२ ऑक्‍टोबर रोजी सकाळी पावणेसात ते नऊ या वेळेत दोन जण आले. त्यांनी धनकवडीतील घटनेप्रमाणेच एटीएम मशिनचे डिस्प्ले हुड उघडले व आठ लाख १२ हजार रुपयांची रक्कम काढून घेतली.

घटना क्रमांक ३ : स्टेट बॅंकेच्या हिंगणे खुर्द येथील एटीएममध्ये ७ ते २४ ऑक्‍टोबर या कालावधीत अनोळखी व्यक्तींनी बॅंकेच्या एटीएममध्ये पैसे भरल्याचा बनाव केला. त्याचवेळी ते पैसे काढून घेत एटीएम मशिनचे ‘डिस्पेन्सर’ बटन दाबून ठेवले. त्यामुळे व्यवहार पूर्ण झाला नाही. हा व्यवहार पूर्ण झाला नसल्याचे बॅंकेला सांगत त्यांनी बॅंकेकडून ९६ हजार रुपये उकळले. 

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com