तर राज्यात 'अमूल'ला दूध संकलनाची परवानगी देऊ : सदाभाऊ खोत

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 4 जून 2018

'गेल्या आघाडी सरकारमधील वजनदार नेत्यांच्या खासगी दूध डेअरी आहेत. त्यांनी अतिरिक्त दुधाचा बागुलबुवा निर्माण करून काही खासगी आणि सहकारी दूध संघांना हाताशी धरून दुधाचे दर पाडले आहेत. त्यांची सगळी माहिती संकलित केली असून, याबाबतचा सविस्तर अहवाल मुख्यमंत्री आणि दुग्धविकासमंत्र्यांना सादर करणार आहे, या संघांवर कारवाई करण्याची मागणीही करणार आहे', अशी माहिती कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिली.

पुणे - 'गेल्या आघाडी सरकारमधील वजनदार नेत्यांच्या खासगी दूध डेअरी आहेत. त्यांनी अतिरिक्त दुधाचा बागुलबुवा निर्माण करून काही खासगी आणि सहकारी दूध संघांना हाताशी धरून दुधाचे दर पाडले आहेत. त्यांची सगळी माहिती संकलित केली असून, याबाबतचा सविस्तर अहवाल मुख्यमंत्री आणि दुग्धविकासमंत्र्यांना सादर करणार आहे, या संघांवर कारवाई करण्याची मागणीही करणार आहे', अशी माहिती कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिली.

'या संघांची मुजोरी मोडीत काढण्यासाठी 'अमूल'ला राज्यात दूध संकलनासाठी परवानगीबरोबरच सरकारी दूध डेअरी भाडेतत्त्वावर देण्याचा विचार आहे, असेही या वेळी त्यांनी सांगितले. सोमवारी (ता.४) राज्याच्या खरीप हंगाम आढावा बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये मंत्री सदाभाऊ खोत यांनी ही माहिती दिली.

या वेळी खोत म्हणाले की, सध्या गायीच्या दुधाची विक्री प्रतिलिटर ४० ते ४२ रुपयांनी होत आहे. दूध संकलन ते ग्राहकांपर्यंत पोहचविण्याच्या विविध टप्प्यांतील प्रक्रियेसाठी दूध संघाच्या नफ्यासह १४ रुपये खर्च होतो. हा खर्च वजा करता प्रतिलिटर २८ रुपये शिल्लक राहत असतानादेखील दूध संघ शेतकऱ्यांना दूध दर देत नाहीत. यामागे, आघाडी सरकारमधील खासगी दूध डेअरी असलेल्या वजनदार नेत्यांचे षडयंत्र असून, त्यांनी काही खासगी आणि सहकारी संघांना हाताशी धरून अतिरिक्त दुधाचा बागुलबुवा उभा केला आहे. त्यांच्याबाबत कारवाई करण्यासाठी दोन दिवसांत बैठक घेऊन सविस्तर अहवाल मुख्यमंत्री आणि दुग्धविकासमंत्र्यांना सादर करणार आहे.

खासगी दूध संघाची मक्तेदारी मोडून काढण्यासाठी प्रसंगी अमूलसारख्या चांगले दर देणाऱ्या दूध संघांना राज्यात दूध संकलनासाठीच्या परवानगीबरोबर सरकारी दूध डेअरी भाडेतत्त्वावर वापरण्यासाठी देण्याचा सरकारचा विचार असल्याचेही खोत यांनी यावेळी सांगितले. 

स्वाभिमानी दूध संघाने अतिरिक्त दूध स्वीकारण्यास नकार दिला आहे. त्यांच्यावर कारवाई करणार का, या प्रश्‍नावर मंत्री सदाभाऊ खोत यांनी मात्र नमस्कार करीत बोलणे टाळले.

Web Title: then allow Amul to collect milk in the state says sadabhau khot