
Fire incident : सहा दिवसांपासून घरात चूल पेटलीच नाही; आगीमुळे उघड्यावर आलेल्या कुटुंबाची व्यथा
कॅन्टोन्मेंट : भवानी पेठेतील टिंबर मार्केटला लागलेल्या आगीमध्ये शेजारील कुटुंबीयांच्या संसाराची राखरांगोळी झाली. मागील पाच-सहा दिवसांपासून त्यांची चूलच पेटली नाही, त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. या भयानप्रसंगी मदतीच्या बहाण्याने पगाराचे पैसे, दागिने, मोबाईल, लॅपटॉप अशा वस्तू चोरीला गेल्याची तक्रार संध्या लडकत यांनी केली.
भवानी पेठेतील टिंबर मार्केटला 25 मे, 2023 रोजी पहाटे अडीचच्या सुमारास आग लागली. या आगीत पाच-सहा गोडाऊन जळाले, त्याचवेळी दहा-बारा निवासी घरे आणि शाळेला त्याची मोठी झळ पोहोचली. गोडाऊनला लागून असलेली लडकत वाड्यातील कुटुंबांचा संसार उघड्यावर पडला आहे. दरम्यान, राजकीय मंत्री ते बड्या नेत्यांनी घटनास्थळी पाहणी केली. आमदार रवींद्र धंगेकर यांनी आर्थिक मदत दिली. मात्र, शासन व नेत्यांकडून आश्वासनापलीकडे काहीही मिळाले नाही, असेही लडकत यांनी सांगितले.
व्यापाऱ्यांनी नुकसान भरपाई द्यावी
गोडावूनची स्वच्छता करायला सुरू आहे. मात्र, आमच्याकडे कोणी फिरकले नाही, व्यापाऱ्यांकडे खरेदी-विक्रीची नोंद असते, त्यांचा इन्शुरन्स असतो, त्यांना मदत मिळणार. मात्र, घरामधील वस्तूंची कोणाकडेही नोंद नसते, इन्शुरन्स नसतो, मदत कोणाकडून मिळणार, व्यापाऱ्यांमुळे आमचे नुकसान झाले आहे.
लाकडाच्या दुकानांमुळे ही आग लागली. अनेक ज्वलनशील पदार्थ दुकानांमध्ये ठेवले जातात. मुळात ही जागा निवासी आहे. येथे कुठल्याही प्रकारची काळजी घेतली जात नाही. फायर ऑडिट नाही. परवानगी नसताना भले मोठे शेड्स येथे थाटले जातात. व्यापाऱ्यांच्या निष्काळजी पणा मुळे हे जीवघेणे प्रसंग रहिवाशांवर ओढवले आहे.
रेग्युलेटरसह सर्व संसार जळाला, स्वयंपाक तरी कसा करायचा, खरेदी करण्यासाठीचे पैसेही चोरीला गेले, मदत कोणाकडे मागायची अशा एक ना अनेक समस्यांचा पाढा त्यांनी वाचला आणि व्यापाऱ्यांमुळे नुकसान झाले आहे, त्यामुळे त्यांनीच आम्हाला मदत दिली पाहिजे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
मार्केटमधील आग विझविण्यासाठी गेल्या पाच दिवसांपासून अग्निशमन कार्यरत होते. फायर हायड्रंट च्या लाईन असूनही त्याला पाणी येत नाही. अनेक ठिकाणाहून या लाईंन मधून पाणी सोडले गेले आहे. त्यात गुरुवारी पाणी बंद असल्याने अधिक ताण या दलाला सोसावा लागला.
अशावेळी अप्सरा टॉकीज जवळच्या कॅनॉल मधून पाण्याच्या वापर केला गेला. उन्हाचा दाह अधिक असल्याने अधून मधून आगीचा पेट सुरू होता. सुमारे १०० फेऱ्या सह आग पूर्णपणे थंड करण्यासाठी अग्निशमन वाहनांची रेलचेल सुरू होती. त्यांच्या या कामगिरी बद्दल नागरिकांनी त्यांचे आभार मानले.
दरम्यान गुरुवारी पाणी येत नाही म्हणून घरातील भांडी एका दिवस आधी भरून ठेवले होते, प्रथम त्या पाण्याने घरातील आग विझविण्यासाठी रहिवाशांनी जीवाचा आटापिटा केला.
माजी नगरसेवक संदीप लडकत म्हणाले की, भवानी पेठेतील आग शॉर्टसर्किट आणि छोटे-मोठे सिलिंडर, टर्पेंटाइल, फेविकॉलमुळे आग लागली असावी. पोलीस, तलाठी, अग्निशनकडून वेगवेगळे पंचनामे झाले. या परिसरात आतापर्यंत तीनवेळा आग लागली. व्यावसायिकांकडे परवानग्या नाहीत. व्यापाऱ्यांना इन्शुरन्सची मदत मिळेल. मात्र, दहा-बारा कुटुंबीयांचे काय असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
दरम्यान, सहाय्यक विभागीय अग्निशमन दलाचे अधिकारी रमेश गांगड म्हणाले की, उन्हाळ्यामध्ये आग लागण्याचे प्रकार जास्त आहेत. अतिक्रमण आणि अरुंद रस्ते यामुळे अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी पोहचण्यास अडथळा निर्माण होतो. व्यावसायिकांनी आगप्रतिबंधक उपाययोजना करून घेणे गरजेचे आहे.
आग विझविण्यासाठी आजपर्यंत 100 अग्निशमन वाहनांच्या फेऱ्या झाल्या. अग्निशमनचे जवानही अद्याप तेथे कार्यरत आहेत, असे त्यांनी सांगितले. यावेळी टिंबर मार्केट येथे सुरक्षा म्हणून अंडर वॉटर टँक, हायड्रंट, होज पाईप अशा गोष्टी गोडाऊन मध्ये असायला पाहिजे. त्यामुळे आगीच्या घटना नियंत्रणात येऊन टाळल्या जाऊ शकतात.