बारामतीकरांना आधारकार्डसाठी आधारच नाही !

मिलिंद संगई
मंगळवार, 23 ऑक्टोबर 2018

नव्याने जन्माला येणाऱ्या मुलांची आधार कार्ड काढणे, चुका झालेले आधार कार्ड दुरुस्त करणे किंवा मोबाईल क्रमांक बदलण्यासाठी बारामतीत फक्त पोस्ट कार्यालयातच सुविधा सुरु आहे. दोन तीन खाजगी व्यक्तीही हे काम करतात मात्र त्यांची माहिती नागरिकांना नाही. 

बारामती शहर - प्रत्येक शासकीय कामासाठी लागणाऱ्या आधार कार्डसाठी बारामतीत लोकांना काही आधारच राहिलेला नाही, अशी अवस्था झाली आहे. दोन लाखांच्या लोकसंख्येसाठी अवघी दोन ते तीन आधारकार्ड काढणारी केंद्र शहरात कार्यरत असल्याने लोकांना कमालीचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. 

हल्ली प्रत्येक कामासाठी आधार कार्डाची सर्रास सक्ती केली जाते. अनेकांकडे आधारकार्ड आहेत. पण त्यावर असंख्य चुका झालेल्या आहेत. नव्याने जन्माला येणाऱ्या मुलांची आधार कार्ड काढणे, चुका झालेले आधार कार्ड दुरुस्त करणे किंवा मोबाईल क्रमांक बदलण्यासाठी बारामतीत फक्त पोस्ट कार्यालयातच सुविधा सुरु आहे. दोन तीन खाजगी व्यक्तीही हे काम करतात मात्र त्यांची माहिती नागरिकांना नाही. 

पोस्टामध्ये मनुष्यबळाचा अभाव असल्याने दुपारी दोनच तास ही सेवा सुरु राहते. पोस्टातील आजची परिस्थिती अशी आहे की आधारकार्ड काढणे किंवा दुरुस्तीसाठी तेथे क्रमांक लावावा लागतो व सध्या दोन महिन्यानंतरची तारिख मिळत आहे. ज्यांना तातडीने आधार कार्डात बदल करुन हवे आहेत त्यांना दोन महिने थांबणे शक्य नसल्याने सर्वांना कमालीचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. 

आधारकार्डची सुविधा सुरु असली तरी पुरेसे मनुष्यबळ नसल्याने व एका कर्मचाऱ्याची पूर्णवेळ नियुक्ती करुनही दिवसभरात पंचवीस लोकांचेही काम व्यवस्थित होत नसल्याचे पोस्टाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. लोकांना मनस्तापाला सामोरे जावे लागते. एकीकडे आधारकार्डची केलेली सक्ती आणि दुसरीकडे आधारकार्डसाठी सुविधाच नसल्याने लोकांना कमालीचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. प्रशासनाने याची दखल घेत सुविधा वाढवावी अशी बारामतीकरांची मागणी आहे. 

आधारकार्डबाबत लोकांची गैरसोय होत असल्याने याबाबत आढावा घेऊन यात काय मार्ग काढता येतो याबाबत लवकरच कार्यवाही करु. लोकांना मनस्ताप होणार नाही, यासाठी उपाययोजना निश्चितपणे केली जाईल. - हेमंत निकम, उपविभागीय अधिकारी, बारामती.

 

Web Title: there is no facility in baramati for providing aadhar card