मुख्यमंत्र्यांकडून आदेशच नाही 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 नोव्हेंबर 2018

पुणे - पुणे शहराला दररोज किमान 1350 एमएलडी पाणीपुरवठा करावा, या मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला जलसंपदा विभागाने हरताळ फासला असल्याचे समोर आले आहे. मुख्यमंत्र्यांकडून कोणतेही लेखी आदेश ना जलसंपदा विभागाला आले, ना महापालिकेला मिळाले. दोन्ही संस्थांकडून तसे सांगण्यात आले आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचे आदेश हे बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात ठरला आहे. 

शहराला साडेतेराशेऐवजी साडेअकराशे एमएलडी पाणी देण्याचा निर्णय कालवा समितीच्या बैठकीत झाला. त्यानंतर पाटबंधारे विभागाने खडकवासला धरणावरील दोन पंप बंद केले. त्यामुळे शहराचा पाणीपुरवठा विस्कळित झाला. मध्यंतरी पुण्यात आलेल्या मुख्यमंत्र्यांना भेटून महापौर मुक्ता टिळक यांनी माहिती दिली होती. त्यावर मुख्यमंत्र्यांनी थेट जलसंपदा विभागाचे अवर सचिव शामलाल गोयल यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधला. पुणे शहराला सद्यःस्थितीला जो साडेतेराशे एमएलडी इतका पाणीपुरवठा होत आहे तो कमी न करता आहे तेवढा कायम ठेवण्याची सूचना केली. तसेच, याबाबत आपण जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याशीही चर्चा करू असेही मुख्यमंत्र्यांनी या वेळी स्पष्ट केले होते. 

परंतु वस्तुस्थिती मात्र वेगळीच असून, शहराला दररोज साधारणपणे अकराशे पन्नास ते बाराशे एमएलडी पाणी मिळत आहे. याबाबत जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारले असता त्यांनी नाव न देण्याच्या बोलीवर मुख्यमंत्र्यांचे कोणतेही लेखी आदेश आले नसल्याचे सांगितले. महापालिकेतील अधिकाऱ्यांना विचारले असता, त्यांनीही नाव न देण्याच्या बोलीवर असे कोणतेही लेखी आदेश मिळालेले नाहीत, असे स्पष्ट केले.

Web Title: There is no order from Chief Ministers