पालिकेकडे व्यापाऱ्यांची नोंदच नाही

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 जुलै 2019

सध्या मूळ निर्णयाची अंमलबजावणी सुरू आहे. त्यानुसार पुनर्वसनाची प्रक्रिया सुरू झाली आहे. जागेची उपलब्धता आणि व्यापाऱ्यांची संख्या लक्षात घेऊन नियोजन करण्यात येणार आहे.
- माधव जगताप, प्रमुख अतिक्रमण विभाग, महापालिका

पुणे - मंगळवार पेठेतील प्रमुख रस्त्यावरील जुना बाजार उठवून तेथील वाहतूक सुरळीत करण्याच्या वाहतूक पोलिसांच्या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी महापालिका धावून गेली. मात्र या बाजारात नेमके किती व्यापारी आहेत, त्यांच्या पुनर्वसनाची जागा किती आणि किती व्यापाऱ्यांना अधिकृत परवाने देणार यापैकी एकाही प्रश्‍नाचे उत्तर महापालिकेकडे नाही. त्याचवेळी या निर्णयाविरोधात व्यापारी कुटुंबीयांसह रस्त्यावर उतरल्याने पेच उभा आहे. 

शाहीर अमर साबळे चौक ते कुंभार वेसपर्यंतच्या रस्त्याच्या एका बाजूला दुकाने मांडली जातात. दर रविवारी आणि बुधवारी हा बाजार भरतो. व्यापाऱ्यांसाठी रस्त्यालगत जागा असतानाही ते रस्त्यावर व्यवसाय करतात. त्यामुळे वाहतूक कोंडी होते. ती फोडण्याच्या उद्देशाने व्यापाऱ्यांना रस्त्यावर बसू न देण्याचा निर्णय वाहतूक पोलिसांनी जाहीर केला आहे. त्यानुसार महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने पहिल्याच दिवसापासून अंमलबजावणी केली. याला व्यापाऱ्यांनी विरोध केला. दरम्यान, महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीतही व्यापाऱ्यांच्या पुनर्वसनाबाबत थातूरमातूर चर्चा झाली. यासंदर्भातील माहिती अतिक्रमण विभागाला ४८ तासांतही आयुक्तांना देता आली नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: There is no record of traders in the municipality