शहरी विरुद्ध ग्रामीण असा वाद नको 

शहरी विरुद्ध ग्रामीण असा वाद नको 

पुणे : पुण्यासाठी पाण्याचा जेवढा कोटा मंजूर आहे, तेवढाच पुरवठा केला जाईल, अशी ठाम भूमिका जलसंपदा खात्याने घेतल्यामुळे शहरात त्याचे तीव्र पडसाद उमटत आहेत. महापालिका सध्या रोज 1350 दशलक्ष लिटर पाणी खडकवासला धरण प्रकल्पातून घेत आहे. कालवा सल्लागार समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत प्रतिदिन 1150 दशलक्ष लिटर पाणी देण्याचा निर्णय झाल्यावर "जलसंपदा'ने गेल्या तीन दिवसांपासून त्याची काटेकोर अंमलबजावणी सुरू केली आहे. त्यामुळे महापालिकेची तारांबळ उडाली आहे. 

सात "टीएमसी'चा अतिरिक्त वापर 
पुणे आणि परिसरातील लोकसंख्या सुमारे 40 लाख आहे, असे गृहीत धरून त्यांच्यासाठी वार्षिक 11.5 टीएमसी पाणी मंजूर करण्यात आले आहे. मात्र, महापालिका गेली अनेक वर्षे त्यापेक्षा अधिक पाणी उचलत आहे. "जलसंपदा'च्या आकडेवारीनुसार सन 2014-15 पासून दर वर्षी पाणीवापरात वाढ होत आली आहे. गेल्या वर्षी (2017-18) सर्वाधिक म्हणजे 18.71 टीएमसी पाणी वापरण्यात आले. खडकवासला प्रकल्पातून पुण्याबरोबरच दौंड, हवेली, इंदापूर तालुक्‍यांत शेती आणि पिण्यासाठी पाणी सोडले जाते. पुणे महापालिकेप्रमाणे "जलसंपदा'चे सुमारे चाळीस ग्राहक आहेत. त्यामुळे शहरी आणि ग्रामीण या दोन्ही भागांतील गरजा लक्षात घेऊन पाणीपुरवठ्यातील समतोल साधावा लागतो. त्यातूनच पुण्यात पाणीकपातीचा विषय निघाला की त्याला "शहरी विरुद्ध ग्रामीण' असे स्वरूप अनेकदा प्राप्त होते. आताच्या प्रतिक्रियाही त्याच दिशेने जाणाऱ्या आहेत. 

पाण्याची गळती की चोरी? 
पुणेकरांना वर्षभर मुबलक पाणी मिळते, असा बाहेर सर्वत्र समज आहे. पुणे हे निवासासाठी देशातील सर्वांत उत्तम शहर आहे, असा निष्कर्ष अलीकडेच एका सर्वेक्षणात निघाला होता. हा दर्जा मिळण्यामागे येथील पाण्याची श्रीमंती, हा घटक निश्‍चितच कारणीभूत आहे. येथे विनासायास हवे तेवढे पाणी मिळत असल्याने त्याची उधळपट्टी होते, असा टीकेचा सूरही अनेकदा ऐकायला मिळतो. पुणेकरांना निर्धारित मापदंडापेक्षा (दरडोई 155 लिटर) अधिक पाणी मिळते, हे शहरातील कोणत्याही पक्षाचा कोणताही लोकप्रतिनिधी सहसा जाहीरपणे मान्य करीत नाही. शहरातील वितरण व्यवस्था चांगली नसल्यामुळे चाळीस टक्के पाणी गळतीमुळे वाया जाते, असे सातत्याने सांगितले जाते. त्याला नेमका आधार काय, हे स्पष्ट झालेले नाही. पाण्याची गळती होते, की चोरी होते, हा संशोधनाचाच विषय आहे! 

'जलसंपदा'ची कडक भूमिका 
महापालिका प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी या विषयाकडे हव्या त्या गांभीर्याने लक्ष दिलेले नाही. कारण, कागदोपत्री मंजूर कोटा साडेअकरा टीएमसी असला तरी, आजवर हवे तेवढे पाणी बिनबोभाट उचलले जात होते. महापालिकेने किमान साडेसहा टीएमसी सांडपाण्यावर फेरप्रक्रिया करून ते शेतीसाठी उपलब्ध करून दिले पाहिजे, अशी अट आहे; पण तिची शंभर टक्के अंमलबजावणी कधीच झालेली नाही. पाणीप्रश्‍नावर "जलसंपदा', महापालिका यांनी तेवढ्यापुरते एकमेकांकडे बोट दाखवायचे आणि नंतर पुन्हा सारे "जैसे थे' असा कारभार आतापर्यंत सुरू होता. यापुढे त्याला लगाम बसेल, अशी चिन्हे दिसू लागली आहेत. महापालिका जादा पाणी उचलत आहे, असा आक्षेप घेऊन जलसंपदा विभागाने खडकवासला धरणावरील महापालिकेचे दोन पंप बंद केले. विशेष म्हणजे त्यासाठी पोलिसांची मदत घेण्यात आली. त्यावरून, हा विषय पूर्वीप्रमाणे सौम्यपणे न हाताळता कडक भूमिका घेण्याचा "जलसंपदा'चा पवित्रा असल्याचे दिसते. मंत्रिस्तरावर पाठिंबा असल्याखेरीज हे खाते असे धाडस करेल, ही शक्‍यता नाही! 

रोज दोनशे दशलक्ष लिटरची कपात 
'पाणीकपात दसरा-दिवाळीनंतर करावी,' अशी मागणी महापौर आणि महापालिकेतील सभागृह नेत्यांनी केली आहे. त्यामुळे कालवा सल्लागार समितीचा निर्णय मान्य करणे अपरिहार्य असल्याचे त्यांनीही स्वीकारले असावे, असे वाटते. त्यांची विनंती मान्य झाल्यास, आताचा प्रश्‍न काही दिवस पुढे ढकलला जाईल एवढेच. रोज दोनशे दशलक्ष लिटरची कपात झाल्यामुळे शहराच्या पूर्व भागातील पाणीपुरवठा विस्कळित झाला आहे. या विषयात कोणतेही राजकारण न आणता त्याचा वस्तुनिष्ठ विचार होण्याची गरज आहे. 

पाण्याचे स्रोत तेवढेच राहणार 
पुण्याचा विस्तार दिवसेंदिवस वाढत आहे. साहजिकच पाण्याची मागणीही वाढणार आहे. पाण्याचे स्रोत मात्र मर्यादित आहेत. पुण्याला सध्या खडकवासला धरण प्रकल्पातील पानशेत, वरसगाव, टेमघर आणि खडकवासला या चार धरणांतून पाणीपुरवठा होतो. पाण्याची गरज वाढली असली तरी ती भागविण्यासाठी नवीन धरण बांधणे आता शक्‍य नसल्याचे जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी स्पष्ट केले आहे. भामा-आसखेड धरणातून पुण्यासाठी पाणी आणण्याच्या प्रकल्पातही अनेक अडथळे आहेत. त्यामुळे उपलब्ध पाण्याचे अधिकाधिक काटेकोर नियोजन करणे, एवढेच महापालिकेच्या हाती आहे. त्यावर विनाविलंब कार्यवाही होण्याची गरज आहे. तोपर्यंत या प्रश्‍नाला किमान "शहरी विरुद्ध ग्रामीण' असा रंग येणार नाही, याची दक्षता सर्वसंबंधितांनी घेतली पाहिजे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com