युतीसाठी कोणताही अल्टिमेटम नाही - लक्ष्मण जगताप

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 जानेवारी 2017

पिंपरी - भाजप-शिवसेना युती होण्यासाठी शिवसेनेकडून कोणताही अल्टिमेटम दिलेला नाही. शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांबरोबर बैठक होणार असून, त्यात पुढील चर्चा होईल, अशी माहिती भाजपचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पिंपरी - भाजप-शिवसेना युती होण्यासाठी शिवसेनेकडून कोणताही अल्टिमेटम दिलेला नाही. शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांबरोबर बैठक होणार असून, त्यात पुढील चर्चा होईल, अशी माहिती भाजपचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी पत्रकार परिषदेत दिली.

भाजप-शिवसेना युतीबाबत चर्चेची दुसरी फेरी गेल्या आठवड्यात झाली. या फेरीनंतर शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे, शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार गौतम चाबुकस्वार व शहराध्यक्ष राहुल कलाटे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्या वेळी त्यांनी भाजपसोबत युती करण्यासाठी 20 जानेवारीचा अल्टिमेटम दिला होता. तोपर्यंत युती न झाल्यास शिवसेना वेगळा विचार करेल, असेही बारणे यांनी स्पष्ट केले होते.

याबाबत जगताप यांना विचारले असता ते म्हणाले, 'शिवसेनेकडून युती करण्यासाठी भाजपला कोणताही अल्टिमेटम दिलेला नाही. युतीबाबत चर्चा सुरू आहे आणि ती सुरू राहील. चर्चेसाठी शिवसेनेचे वरिष्ठ नेते पिंपरीत येणार आहेत. त्यांच्याशी बोलणी सुरू आहेत. आम्ही युतीबाबत आशावादी आहोत.''

युती करताना जागांचे समसमान वाटप होईल. तसेच शिवसेनेची आरपीआयबरोबर युती नसल्याने भाजप त्यांच्या कोट्यातून आरपीआयला जागा देईल, असेही बारणे यांनी स्पष्ट केले होते. याबाबत आमदार जगताप म्हणाले, 'शिवसेना 50 टक्‍के म्हणजे 64 जागा, आरपीआय 30 तर रासप 23 जागांची मागणी करीत आहे. या सगळ्यांच्या मागणीचा विचार केल्यास भाजप फक्‍त 10 ते 12 जागांवर निवडणूक लढविणार का? निवडून येण्याची क्षमता, याच निकषावर युतीची बोलणी सुरू आहेत.''

.. तर संधी देण्यास हरकत काय - जगताप
यशवंत भोसले हे तडीपार गुंडांना सोबत घेऊन फिरतात, असा आरोप राष्ट्रवादीचे शहर प्रवक्‍ते योगेश बहल यांनी केला आहे. याबाबत बोलताना भाजपचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप म्हणाले, ""रामदास आठवले साहेबांनी सांगितले आहे, की एखादा गुन्हेगार सुधारत असेल, तर त्याला संधी द्यायला हवी. तशीच संधी येथील लोकांना दिली तर काय हरकत आहे. वाल्याचा वाल्मीकी होऊ शकतो; मग ते का होऊ शकत नाहीत.'' दरम्यान, बहल यांचे आरोप खोटे असून, उलट यांच्याबरोबरच खुनी आणि दरोडेखोर फिरत आहेत, असे यशवंत भोसले यांनी सांगितले.

Web Title: There is no ultimatum to alliance