तूर्तास पुण्यात पाणीकपात नाही 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 22 डिसेंबर 2018

जलसंपदा विभागाकडून दिलासा, वॉटर ऑडिटनंतर कोटा निश्‍चिती 

पुणे - जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने महापालिकेला "वॉटर बजेट' सादर करण्यासाठी एक महिन्याचा कालावधी दिला आहे. महापालिकेने दररोज 1150 दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणी देण्याबाबत जलसंपदा विभागाला पत्र दिले आहे. परंतु दररोज सरासरी 1350 एमएलडी पाणी दिले जात आहे. शहराच्या पाणीपुरवठ्यात सध्या कोणतीही कपात केलेली नाही, असे जलसंपदा विभागाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे तूर्तास शहरावरील पाणीकपातीचे संकट टळले आहे. 

जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने पुणे शहराला लोकसंख्येच्या आधारे महापालिकेला दररोज 650 दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणीपुरवठा करण्यात यावा, असे आदेश नुकतेच दिले आहेत. या निर्णयामुळे शहराला सध्याच्या तुलनेत निम्मेच पाणी मिळणार आहे. त्यामुळे शहरावर पाणीकपातीचे संकट घोंगावत आहे. 

यासंदर्भात जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने महापालिकेला एक महिन्यात "वॉटर बजेट' आणि तीन महिन्यांत "वॉटर ऑडिट' सादर करण्यास सांगितले आहे. त्यात शहराची लोकसंख्या, शहरालगतच्या गावांमधील लोकसंख्या, अन्य भागांतून शहरात येणारे नागरिक आणि पाणीगळती याबाबत सुधारित माहिती द्यावी लागणार आहे. जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता यांच्याकडे "वॉटर बजेट' सादर करावे लागणार आहे. त्यानुसार अधीक्षक अभियंत्यांकडून पाणी कोटा निश्‍चित करण्यात येईल. तो निर्णय मान्य नसल्यास प्राधिकरणाकडे अपील करता येईल. तेथेही दिलासा न मिळाल्यास महापालिकेला उच्च न्यायालयात दाद मागावी लागेल. याबाबत अंतिम निर्णय होईपर्यंत पाणीकपात होण्याची शक्‍यता कमी असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

दरडोई 155 लिटर या मापदंडानुसार पुणे शहरातील सुमारे 40 लाख लोकसंख्येला वर्षाला आठ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणी पुरेसे आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून सुमारे 25 टीएमसी पाणी घेतले जाते. सव्वा कोटी लोकांना पुरेल इतके पाणी आहे. परंतु शहरात पाणीपुरवठ्यातील विषमता आणि गळती रोखण्यात यश मिळत नाही, तोपर्यंत पाणी प्रश्‍न सुटणार नाही, असे मत जलसंपदा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने व्यक्‍त केले. 
 
काही गावांना पालिकेसोबतच जलसंपदाकडूनही पाणीपुरवठा 
जलसंपदा विभागाकडून पुणे महापालिकेसह शहरालगतची गावे, टाऊनशिप आणि उद्योग अशा 81 आस्थापनांना पाणीपुरवठा केला जातो. त्यात 16 ग्रामपंचायतींचा समावेश आहे. तर महापालिकेकडून 21 ग्रामपंचायतींना पाणीपुरवठा केला जातो. त्यात काही गावे जलसंपदा आणि महापालिका असे दोन्हीकडून पाणी घेत असल्याचे समोर आले आहे. अशा ग्रामपंचायतींची माहिती जलसंपदा विभागाकडून घेतली जात आहे.

Web Title: There is no water cutting in pune