तूरडाळ न घेतल्यास गहू, तांदूळ नाही

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 एप्रिल 2018

पुणे - तूरडाळ न उचलल्यास गहू आणि तांदूळही मिळणार नाही, असा अप्रत्यक्ष इशारा पुरवठा विभागाने स्वस्त धान्य दुकानदारांना दिला आहे. तर दुसरीकडे तूरडाळ मुबलक प्रमाणात मिळत नसून, किलोमागे मार्जिनही कमी असल्याचे कारण देत स्वस्त धान्य दुकानदारांकडून नाराजी व्यक्‍त केली जात आहे. यामुळे तूरडाळीच्या या मुद्यावरून वाद निर्माण होण्याची शक्‍यता आहे.

पुणे - तूरडाळ न उचलल्यास गहू आणि तांदूळही मिळणार नाही, असा अप्रत्यक्ष इशारा पुरवठा विभागाने स्वस्त धान्य दुकानदारांना दिला आहे. तर दुसरीकडे तूरडाळ मुबलक प्रमाणात मिळत नसून, किलोमागे मार्जिनही कमी असल्याचे कारण देत स्वस्त धान्य दुकानदारांकडून नाराजी व्यक्‍त केली जात आहे. यामुळे तूरडाळीच्या या मुद्यावरून वाद निर्माण होण्याची शक्‍यता आहे.

यंदा तूरडाळीचे उत्पादन चांगले झाले आहे. त्यामुळे पुरवठा विभागाने सर्व शिधापत्रिकाधारकांना तूरडाळ देण्याचा निर्णय घेतला आहे. स्वस्त धान्य दुकानांमध्ये तूरडाळीचा दर ५५ रुपये प्रतिकिलो, तर खुल्या बाजारात तूरडाळीचा दर ६२ ते ६५ रुपये प्रतिकिलो आहे. खुल्या बाजारातील तूरडाळीचा दर्जा हा तुलनेत चांगला आहे. परंतु स्वस्त धान्य दुकानातून आणि खुल्या बाजारातील तूरडाळीच्या दरात जादा फरक नाही. त्यामुळे ग्राहकांचा कल हा बाजारातूनच तूरडाळ खरेदी करण्याचा आहे. या कारणांमुळे बहुतांश स्वस्त धान्य दुकानदारांनी तूरडाळ उचलणे बंद केले आहे. त्यावर पुरवठा विभागाने तूरडाळ न घेतल्यास गहू आणि तांदळाचे वाटप बंद करण्याचा इशारा दिला आहे.

स्वस्त धान्य दुकानदारांना ५४ रुपये ३० पैसे प्रतिकिलो दराने तूरडाळ मिळते. ग्राहकांना ती ५५ रुपये दराने विक्री केली जाते. दुकानदारांना तूरडाळीला किलोमागे केवळ ७० पैसे मिळतात. तर खुल्या बाजारात तूरडाळीचे दर ६२ ते ६५ रुपये किलो आहेत. या दरामध्ये फारशी तफावत नसल्यामुळे बहुतांश ग्राहक खुल्या बाजारातून तूरडाळ खरेदी करतात. पुरवठा विभागाकडून मुबलक तूरडाळ मिळत नाही. त्यामुळे पुरवठा विभागाने तांत्रिक अडचणी दूर करून शिधापत्रिकेनुसार कोटा ठरवून द्यावा. 
- गणेश डांगी, अध्यक्ष, पुणे शहर अखिल महाराष्ट्र स्वस्त धान्य दुकान आणि केरोसिन महासंघ

स्वस्त धान्य दुकानातील तूरडाळ तुलनेत हलक्‍या दर्जाची आहे.  मात्र स्वस्त धान्य दुकान आणि खुल्या बाजारातील तूरडाळीच्या दरात फारशी तफावत नाही. प्रतिकिलोमागे केवळ पाच ते दहा रुपयांचा फरक आहे. त्यामुळे बहुतांश ग्राहकांचा कल हा खुल्या बाजारातून तूरडाळ खरेदी करण्याकडे आहे. 
- सचिन निवुंगणे, अध्यक्ष, पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघ

सध्या स्वस्त धान्य दुकानात तूरडाळ मिळत नाही. तूरडाळ खरेदी न करताही पावतीवर मात्र तूरडाळ घेतल्याचा उल्लेख येतो. शिवाय साखर मिळण्यासही अडचण येत आहे.  
- ज्ञानेश्‍वर चाचर, ग्राहक, बिबवेवाडी  

Web Title: There is no wheat rice without turdal