बारामती तालुका टँकरमुक्तीच्या दिशेने...

मिलिंद संगई
शुक्रवार, 30 मार्च 2018

संपूर्ण मार्च महिना सरल्यानंतरही बारामती तालुक्यात अजून एकही टँकर सुरु झालेला नाही किंवा मागणीही आलेली नाही. टँकरमुक्तीच्या दिशेने बारामती तालुक्याची वाटचाल आता सुरु झाली आहे. 

बारामती - लोकसहभाग, सेवाभावी संस्थांची उपयुक्त मदत आणि विविध राजकीय पक्ष व संघटनांच्या पुढाकारातून झालेल्या जलसंधारणाच्या कामांचे दृश्य परिणाम बारामती तालुक्यात यंदा पाहावयास मिळत आहेत. संपूर्ण मार्च महिना सरल्यानंतरही बारामती तालुक्यात अजून एकही टँकर सुरु झालेला नाही किंवा मागणीही आलेली नाही. टँकरमुक्तीच्या दिशेने बारामती तालुक्याची वाटचाल आता सुरु झाली आहे. 

बारामती तालुका टँकरमुक्त करण्यासाठी लोकसहभागातून गेल्या तीन वर्षात जलसंधारणाची प्रचंड कामे झाली. त्यामुळे सन 2017 च्या पावसाळ्यात पडलेल्या पावसाचे पाणी वाहून न जाता साठून राहिले, जमिनीत मुरले त्यामुळे यंदा विहीरींच्या पाण्याची पातळी टिकून राहिली. 

ज्या नाझरे धरणावर मोरगाव प्रादेशिक नळपाणीपुरवठा योजना अवलंबून आहे त्या नाझरे धरणात यंदा किमान तीन महिने तरी पुरेल इतका पाणीसाठा असल्याने यंदा या योजनेवर अवलंबून असलेल्या अठरा गावांना तरी टँकरची गरज भासणार नाही, अशी माहिती गटविकास अधिकारी प्रमोद काळे यांनी दिली. 

जलसंधारणाची भरीव कामे
सन 2015-2016 मध्ये जलसंधारणाची 692 तर 2016-2017 मध्ये 763 कामे बारामती तालुक्यात झाली. या दोन वर्षात झालेल्या कामांमुळे तालुक्यात 15558 टीसीएम इतका पाणीसाठा वाढण्याचा अंदाज शासकीय सूत्रांनी व्यक्त केला आहे. ओढा सरळीकरण व खोलीकरण, कंपार्टमेंट बंडीग, शेततळी, सिमेंट नालाबांध, साठवण बंधारे, सलग समतल चर निर्मिती अशी अनेक कामे या काळात झाली. 

टँकरची संख्या नगण्य होणार
टंचाईची तीव्रता व पावसाने दिलेली हुलकावणी यामुळे गेल्या दोन वर्षात बारामती तालुक्यात टँकरची संख्या मोठी होती. सन 2015-2016 मध्ये 15 तर 2016-2017 मध्ये 21 टँकरने जवळपास निम्म्या तालुक्याला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात होता. यंदा पाच पेक्षा जास्त टँकर लागणार नाहीत असा प्रशासनाचा अंदाज आहे. टँकरमुक्तीच्या दिशेने यंदा तालुक्याची वाटचाल असून या उन्हाळ्यात आणखी जलसंधारणाची कामे लोकसहभाग व शासनस्तरावर करण्यासाठी यंत्रणा प्रयत्नशील असल्याचे प्रमोद काळे म्हणाले. 

वरुणराजाची कृपा महत्वाची
गतवर्षी सरासरीच्या 154 टक्के पाऊस बारामतीत पडला व त्याचा फायदा झाला. यंदाही जूनमध्ये पावसाने हजेरी लावली तर नक्की दिलासा मिळेल. मान्सून लांबला तर मात्र कदाचित चित्र वेगळे असू शकते. 

 

Web Title: There will be a free of tanker in Baramati taluka soon