सुरक्षित पदपथ आणि सायकल ट्रॅकची सुविधा असेल, तर....

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जून 2020

...तरच करू पीएमपीचा प्रवास
नागरिकांकडून प्रवासासाठी खासगी वाहनांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. अशात पीएमपी बसचा वापर करण्यास त्यांची पसंती नसते. परंतु, पीएमपी बसची संख्या वाढली आणि त्यामुळे गर्दीचे प्रमाण कमी झाले, तरच बसचा वापर करू, असे मत नागरिकांनी व्यक्‍त केले.

पुणे - सुरक्षित सुविधा दिल्यास नागरिक चालण्याला आणि सायकल चालविण्यास प्राधान्य देतील, असा निष्कर्ष परिसर संस्थेने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त केलेल्या ऑनलाइन सर्वेक्षणातून निघाला आहे. याबाबतचा अहवाल संस्थेने रविवारी (ता. २८) जाहीर केला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोनाच्या लॉकडाउनमुळे वाहतूक आणि सर्व उद्योग बंद होते. त्यामुळे प्रदूषणात घट झाली. परंतु, वायुप्रदूषणाचे प्रमाण जास्त असलेल्या भागांमध्ये कोरोना रुग्णांची व मृतांची संख्या जास्त असल्याचे इटली आणि हार्वर्ड येथे झालेल्या अभ्यासातून स्पष्ट झाले. वाहनांमुळे होणारे उत्सर्जन वायुप्रदूषणाचे प्रमुख घटक आहेत.

या परिस्थितीला कसा प्रतिसाद द्यावा, याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी एक सर्वेक्षण केले. यामध्ये नागरिकांनी सुरक्षित पदपथ आणि सायकल ट्रॅकची सुविधा असेल, तर खासगी वाहनांऐवजी सायकल किंवा चलण्याला प्राधान्य देऊ, असे कळविले. यामध्ये पाच किलोमीटरपर्यंतच्याच प्रवासासाठी चालण्याला आणि सायकल चालविण्यासाठी सर्वाधिक नागरिकांनी पसंती दाखवली. या सर्वेक्षणात १५४ लोकांनी भाग घेतला होता, अशी माहिती ‘परिसर’च्या श्वेता वेरणेकर यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: There will be safe sidewalks and cycle tracks walking and cycling