बारामती, इंदापूर, दौंड तहानलेले 

बारामती, इंदापूर, दौंड तहानलेले 

भवानीनगर - जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात सारी धरणे काठोकाठ भरली असली, तरी बारामती, इंदापूर व दौंड तालुक्‍यामागचे दुष्काळी स्थितीचे शुक्‍लकाष्ट काही संपत नाही. ऐन पावसाळ्यात जिल्ह्यातील या तीन तालुक्‍यांत ५ टॅंकर सुरू असून, ४ गावे व ३६ वाड्यांवर टंचाई आहे. खरिपाच्या पिकांचा प्रश्‍न तर बाजूलाच राहिला आहे!

पुणे जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात अनेक ठिकाणी पूरस्थिती असली, तरी बारामती, इंदापूर व दौंड या पारंपरिक अवर्षणाखालच्या भागात आजची स्थिती भीषण बनत चालली आहे. धरणांमुळे कालव्यात व नद्यांमध्ये आलेले पाणी एवढेच समाधान शेतकऱ्यांमध्ये आहे. मात्र, इतरत्र पावसाअभावी पिके करपू लागली आहेत. जून महिन्यात झालेला एक पाऊस व चार दिवसांपूर्वी झालेला भीजपाऊस वगळता या तीन तालुक्‍यांत यंदाही मोसमी पावसाने दगाच दिला आहे. त्यामुळे खरिपाची पिकेही घटली आहेत.

विशेष म्हणजे राज्यात इतरत्र पाण्याचा महापूर असला, तरी बारामती तालुक्‍यात आतापर्यंत सरासरी १४८ मि.मी. पाऊस झाला असून, तो नेहमीच्या पावसाच्या निम्माही नाही. दौंड तालुक्‍यात तर आतापर्यंत केवळ सरासरी ११४ मि.मी. पाऊस झाला असून, तालुक्‍याच्या सरासरीच्या केवळ ३५ टक्के एवढाच पाऊस झालेला आहे. 

या तीनही तालुक्‍यांत उसाचे नगदी प्रमुख पीक असल्याने खरिपातील आडसाली लागवडी शेतकऱ्यांनी पावसाच्या भरवशावर केल्या आहेत. 

मात्र, पावसाने पाठ फिरवल्याने आता कालव्याचे आवर्तन सोडण्याची मागणी गावागावातून होऊ लागली आहे. 

खरिपाच्या ४० टक्केच पेरण्या
उपविभागीय कृषी अधिकारी बालाजी ताटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या खरिपात पावसाने पाठ फिरवल्याने बारामतीत बाजरीचे क्षेत्र २० टक्‍क्‍यांवर आले असून, ८ हजार हेक्‍टरऐवजी आतापर्यंत फक्त १४०० हेक्‍टर एवढीच बाजरी पेरणी झाली आहे. मक्‍याचेही क्षेत्र ४० टक्केच असून, २ हजार हेक्‍टरऐवजी ८०० हेक्‍टर एवढीच मका लागवड झाली आहे. बारामतीत तुरीची पेरणी २०० हेक्‍टरवर खरिपात होते. यंदा मात्र २५ हेक्‍टर एवढीच झाली आहे. दुसरीकडे दौंडमध्ये ३६०० हेक्‍टरवर घेतली जाणारी बाजरी सध्या ८७५ हेक्‍टरपर्यंतच लागवड झाली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com