सहा महिन्यांपासून 'ते' भोगत आहेत नरकयातना

संदीप घिसे 
गुरुवार, 13 डिसेंबर 2018

पिंपरी (पुणे) : कामातला 'क' देखील माहिती नसलेल्या दोन लहानग्यांकडून सावत्र आई घरातील सर्व कामे करून घेत. काम न केल्यास कधी काठीने मारहाण तर कधी गरम लोखंडी सळईने चटके. एवढेच नव्हे तर त्या दोन निरागस जिवांना उपाशीही ठेवायचे. बाल वयात या नरकयातना सहन न झाल्याने ते लहान बहिण भाऊ गावाला पळून चालले होते. मात्र नागरिकांच्या सतर्कतेमुळे पोलिसांच्या हाती लागले. पोलिसांनी पुढाकार घेत सावत्र आई आणि वडिलांवर गुन्हा दाखल केला आहे.

सावत्र आई मनिषा सूर्यवंशी आणि वडिल गडेराव सूर्यवंशी (रा. स्टी पॅरेडाईज, मोशी. मूळगाव शिवपूर, लातूर.) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

मोशी येथे राहणारा महेश नऊ वर्षांचा तर वैष्णवी सात वर्षांची. ते दोघेही एका इंग्लिश मिडियम शाळेत शिकण्यास आहेत. काही वर्षांपूर्वी त्यांच्या आईचे मानसिक संतुलन बिघडल्याने वडिलांनी दोन वर्षापूर्वी दुसरे लग्न केले. लग्ननंतर आलेली सावत्र आई नेहमीच तुसडेपणाने वागत असे. मात्र गेल्या सहा महिन्यांपासून त्या दोन लहानग्यांचा त्रास वाढतच गेला. घरातील धुणी भांडी करणे, फरशी पुसणे, स्वयंपाक करणे, अशी कामे त्या दोन बहीण भावांकडून सावत्र आई करून घेत असे. कामांमध्ये काही चुका झाल्यास किंवा कामाला उशीर झाल्यास त्यांना काठीने मारहाण केली जात होती. तसेच कधी-कधी गरम सळईचे चटकेही दिले जात होते. काम न केल्यास त्यांना वेळोवेळी उपाशीही ठेवण्यात येत होते. 

दररोज होणारा हा त्रास सहन न झाल्याने त्या दोघांनी लातूर येथील गावाला आपल्या आईकडे जाण्याचा निर्णय घेतला. मोशीपासून ते चालत भोसरी पर्यंत आले. तेथून लातूर येथे जाण्यासाठी कोणते वाहन मिळेल ,याबाबत नागरिकांकडे चौकशी करीत होते. ही बाब एका नागरिकाने पोलिसांना सांगितली. त्यानुसार भोसरी पोलिसांनी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास त्या दोघांना ताब्यात घेतले. त्यांना विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्यांनी आपल्याबाबत घडत असलेला प्रसंग पोलिसांना सांगितला. त्यांच्या अंगावरील जखमा पाहून पोलिसांनाही आपले अश्रु अनावर झाले. त्यांनी त्या दोन्ही मुलांना घेऊन वायसीएम रुग्णालय गाठले. तिथे त्या मुलांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तसेच अमानुष मारहाण करणाऱ्या सावत्र आईवर गुन्हा दाखल करीत पुढील कारवाई भोसरी पोलिसांनी सुरू केली आहे.

Web Title: they suffer harm from their step mother from 6 months