चोरट्याची फळ्यावर लिहून विनंती, "पोलिसात तक्रार देऊ नका,  चोरलेला माल परत देईन...' 

विवेक शिंदे
बुधवार, 7 ऑगस्ट 2019

शाळेच्या कार्यालयाचे गज उचकटून चोरटा 45 हजारांचा ऐवज लांबवितो, पण त्याचवेळी शाळेच्या फळ्यावर खडूने लिहून विनंती करतो की, "माझ्या परिस्थितीमुळे मला हे सर्व करावे लागत आहे, तरी हे कुठे कळवू नये. आपला सर्व माल एकदिवस कमवून परत देईन. तरी आपण पोलिसमध्ये तक्रार देऊ नका. आपला आभारी असेल...' 

महाळुंगे पडवळ (पुणे) : शाळेच्या कार्यालयाचे गज उचकटून चोरटा 45 हजारांचा ऐवज लांबवितो, पण त्याचवेळी शाळेच्या फळ्यावर खडूने लिहून विनंती करतो की, "माझ्या परिस्थितीमुळे मला हे सर्व करावे लागत आहे, तरी हे कुठे कळवू नये. आपला सर्व माल एकदिवस कमवून परत देईन. तरी आपण पोलिसमध्ये तक्रार देऊ नका. आपला आभारी असेल...' 

चोरीचा हा अजब प्रकार घडला आहे, आंबेगाव तालुक्‍यातील चांडोली बुद्रूक येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत. विशेष म्हणजे गेल्या आठवडाभरात शाळेत घडलेला हा चोरीचा दुसरा प्रकार आहे. पण, या वेळी चोरट्याने केलेल्या या अजब विनंतीने सगळेच चक्रावले आहेत. 

या शाळेच्या शिक्षिका शैला खेडकर या मंगळवारी (ता. 6) सकाळी शाळेत आल्या. त्यावेळी त्यांना, शाळेच्या कार्यालयाच्या मागील बाजूला असलेल्या खिडकीचे गज उचकटलेले व दरवाजाला कडी लावल्याचे दिसले. त्यांनी याबाबत मुख्याध्यापिका दीपाली अजाब यांनी कळविले. तसेच, फळ्यावर चोरट्याने लिहून केलेली विनंती पाहून सगळेच आश्‍चर्यचकित झाले. 
शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा राणी थोरात, सदस्य प्रवीण थोरात पाटील, गुलाब थोरात आदींनी घटनास्थळी भेट पाहणी केली. मुख्याध्यापक अजाब यांनी मंचर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार बीट अंमलदार राजेंद्र हिले, पोलिस गजानन डावखर, अजित मडके यांनी पंचनामा केला. दहा हजार 500 रुपये किमतीचा इंनटेक्‍स कंपनीचा 32 इंची टीव्ही, 35 हजार रुपये किमतीचा 32 इंची टीव्ही, त्याला कॉमकीन कंपनीचे ई लर्निंग सॉफ्टवेअर व एक पेन ड्राईव्ह, असा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला आहे. 

चोरटा पंचक्रोशीतील असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र, गेल्या आठ दिवसांत शाळेत दुसऱ्यांदा चोरी प्रकार घडल्याने शाळेच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे पोलिसांनी चोरट्यांचा ताबडतोब बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The thief wrote on the board, will return your goods, don`t complain to the police