'सर्व धर्मांचे विचार मानवता भवनद्वारे एकत्र '

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 31 जानेवारी 2017

धर्म नव्हे, तर त्या विषयीची चुकीची समजूत ही खरी समस्या आहे. त्याबद्दल जागृती घडविण्याचे काम शैक्षणिक संस्थांचे आहे. त्यांनी ते करायला हवे. 
- डॉ. विजय भटकर

पुणे - ""अलीकडच्या काळात धर्मवाद आणि राष्ट्रवाद हे मुद्दे सर्वत्र लोण बनून पसरत चालले आहेत. अशा काळात "मानवता भवन' हे एखाद्या बहिर्वक्र भिंगाप्रमाणे सर्व धर्मांच्या समांतर विचारांना एकाच केंद्रबिंदूपाशी एकत्र आणण्याचे महत्त्वाचे कार्य करेल...,'' अशी आशा शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी येथे व्यक्त केली. 
"विश्‍वधर्मी श्री राम मानवता भवन' या प्रस्तावित वास्तूच्या प्रतिकृतीचे एमआयटी आणि एमआयटी विश्‍वशांती केंद्रातर्फे सोमवारी अनावरण आणि लोकार्पण करण्यात आले. या वेळी माशेलकर बोलत होते. 

संगणकतज्ज्ञ डॉ. विजय भटकर, आचार्य गोविंद देव गिरी, राम विलास वेदांती, डॉ. एस. एन. पठाण, डॉ. विश्‍वनाथ कराड आदी उपस्थित होते. "आंतरधर्मीय सुसंवाद' या विषयावरील राष्ट्रीय गोलमेज परिषदेचेही या वेळी उद्‌घाटन झाले. 

माशेलकर म्हणाले, ""आज जिकडे पाहावे तिकडे जगाची निरनिराळ्या कारणांनी विभागणी होत आहे. भेदभावाच्या भिंती सर्वत्र उभ्या राहू लागल्या आहेत. अशा काळात सर्वांना बांधून ठेवण्याची आवश्‍यकता आहे. शांतता आणि सुसंवाद अंतर्बाह्य प्रस्थापित व्हायला हवा.'' 

भटकर म्हणाले, ""धर्म म्हणजे नक्की काय, याचा पुनर्विचार होण्याची गरज आहे. त्याचा अर्थ अजूनही उमगलेलाच नाही. सत्य आणि सहवेदना या दोन गोष्टींच्या सोबतच मानवतेचा विचार पसरवायला हवा.'' 

असे आहे मानवता भवन! 
विविध धर्मांच्या प्रार्थनास्थळांच्या छोट्या प्रतिकृती या देखण्या भवनात बसविण्यात आल्या आहेत. लोकार्पणानंतर प्रत्येक धर्माच्या प्रार्थना गीतांचे ध्वनिमुद्रणही ऐकविण्यात आले. 

धर्म नव्हे, तर त्या विषयीची चुकीची समजूत ही खरी समस्या आहे. त्याबद्दल जागृती घडविण्याचे काम शैक्षणिक संस्थांचे आहे. त्यांनी ते करायला हवे. 
- डॉ. विजय भटकर

Web Title: Think of all the religions together by humanity Building