जुन्नरमध्ये शिवसेनेला तिसरा झटका

दत्ता म्हसकर
सोमवार, 22 जुलै 2019

गटनेतेपद देण्यात डावलल्याने लांडे समर्थकांत नाराजी 
जुन्नर : जुन्नर तालुका शिवसेनेला तिसरा झटका बसण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषदेतील पक्षाच्या गटनेत्या आशा बुचके यांच्या हकालपट्टीनंतर त्यांच्या समर्थकांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले; तर नुकतेच तालुका समन्वयक प्रसन्ना डोके यांनी देखील पदाचा राजीनामा दिला. त्यात आता देवराम लांडे नाराज झाले आहेत. आगामी निवडणुकीत जुन्नर तालुका शिवसेनेला याचा मोठा फटका बसण्याची शक्‍यता आहे.  

पुणे जिल्हा परिषदेतील शिवसेनेचे गटनेतेपद आदिवासी विकास आघाडीचे संस्थापक अध्यक्ष देवराम लांडे यांना दिले नाही. त्यामुळे त्यांच्या समर्थकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. जुन्नर, आंबेगाव व खेड तालुक्‍यातील आदिवासी समाजाच्या कार्यकर्त्यांनी देवराम लांडे यांना गटनेतेपद मिळावे, अशी मागणी केली होती. कुकडेश्वरला प्रमुख समर्थक कार्यकर्त्यांची बैठकही झाली होती. त्यावेळी लांडे यांना डावलल्यास शिवसेनेला "जय महाराष्ट्र' करण्याचा विचार कार्यकर्त्यांनी बोलून दाखविला होता. 

शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर गेल्या अडीच वर्षात देवराम लांडे यांना विविध पदापासून सातत्याने डावलण्यात आले असल्याने ते पक्षाच्या कार्यपद्धतीवर नाराज आहेत. त्यांनी आपली नाराजी कार्यकर्त्यांकडे व्यक्त केली आहे. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या "जन आशीर्वाद यात्रे'च्या आळेफाटा येथील स्वागत कार्यक्रमात त्यांची अनुपस्थिती होती. 

शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य झाल्यानंतर लांडे यांना स्थायी, आरोग्य व बांधकाम समिती आणि जिल्हा नियोजन मंडळावर मागणी करूनही संधी दिली गेली नाही. तसेच, आदिवासी समाजातील कार्यकर्त्यास जिल्हा, उपजिल्हाप्रमुख म्हणून पक्ष संघटनेत काम करण्याची संधी द्यावी, अशी तीन तालुक्‍यातील कार्यकर्त्यांनी आणि आदिवासी सरपंच संघटनेने मागणी केली होती. मात्र, ती देखील धुडकावून लावण्यात आली. त्यामुळे आदिवासी समाजास न्याय देण्याचा हेतूने गटनेतेपदाची मागणी करण्यात आली होती, असे घाटघर, निमगिरी, आंबोली, देवळे, बगाडवाडी, घगाळदरे, केवाडी, अंजनावळे, चावंड, आदी गावच्या सरपंच व उपसरपंचांनी सांगितले. 

आमदार वल्लभ बेनके यांच्या काळात आदिवासी समाजाच्या कार्यकर्त्यांना जिल्हा परिषद, पंचायत समितीत सन्मानाची विविध पदे भूषविण्याची संधी मिळाली. देवराम लांडे यांना लाल दिव्याची गाडी दिली. मात्र, शिवसेनेत त्यांच्या कार्यकर्त्याला साधे शाखा अथवा विभागप्रमुख देखील करता आले नसल्याची खंत कार्यकर्ते व्यक्त करत आहेत. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: third shock to Junnar Shivsena