‘दत्तक स्वच्छतागृहा’चा तिसरा वर्धापन दिन आणि...

नंदकुमार सुतार
सोमवार, 1 मे 2017

(आपण अशी समाजोपयोगी मॉडेल्स निर्माण केली असतील तर जरूर कळवा : 
editor@esakal.com)

पुणे - परवा एक जंटलमन एका स्वच्छतागृहासमोर उभे राहून सेल्फी काढताना दिसले. आश्‍चर्याची घटना नव्हे का? सेल्फी काढण्यासाठी लोक सुंदर स्थळे निवडतात किंवा चांगला मूड.... पण हे सद्‌गृहस्थ स्वत:सह स्वच्छतागृहाचे छायाचित्र कॅमेऱ्यामध्ये नीट येते ना? अशी काळजी घेत स्वमुद्रा टिपत होते. त्याचे कारणही तसेच जगावेगळे होते, ते समजून घ्यायलाच हवे.

पुण्यातील सर्व सार्वजनिक स्वच्छतागृहांची अवस्था काय आहे, हे शहरात फिरणाऱ्या सर्वांनाच माहितेय. महिलांची तर मोठी कुचंबणा होते. त्याच्या बातम्या माध्यमांनी प्रसिद्ध केल्या तरी ही अडचण पूर्णपणे दूर झालेली नाही. शहरातल्या अशा या दुर्गंधीयुक्त स्वच्छतागृहांच्या ताफ्यामध्ये नळस्टॉपचे स्वच्छतागृह अपवादात्मक आहे. त्याचाच तिसरा वर्धापन दिन दोन महिन्यांपूर्वी आला होता आणि तो अनोख्या पद्धतीने साजरा करत होते, महापालिकेच्या मागे लागून त्याला दत्तक घेणारे ‘संजीवनी डेव्हलपर्स’चे संजय देशपांडे. खरंच या स्वच्छतागृहाच्या पार्श्‍वभूमीवर स्वमुद्रा टिपण्यासारखीच परिस्थिती आहे. देशपांडे यांनी स्वच्छतागृहाचा कायापालटच केला नाही, तर एवढ्या प्रदीर्घ काळ त्याची देखभाल ठेवली आहे. एखाद्या पायाभूत सुविधेची दुरुस्ती किंवा सुधारणा करून देणे त्यामानाने सोपे असते; परंतु ती पुढे त्याच सुस्थितीत ठेवणे खूप अवघड काम. देशपांडे यांनी ते करून दाखवले आहे आणि त्यामुळेच हे स्वच्छतागृह इतरांसाठी अनुकरणीय मॉडेल ठरू शकते.

हे काम तसे बघायला गेले तर खूप छोटे वाटेल; पण त्याचा परिणाम लक्षात घेतल्यास त्याचे महत्त्व समजून येईल. दुर्गंधीयुक्त स्वच्छतागृहांमुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका तर निर्माण होतोच; पण त्या भागातील सर्वच व्यवहारांवरही परिणाम झालेले आपण पाहतो. ‘संजीवनी ग्रुप’च्या या मॉडेलमुळे हे धोके टळले आणि तीन वर्षांनंतरही हे मॉडेल तग धरून राहिले आहे. त्यातून पुण्याला काही धडे घेता येऊ शकतात. एक- छोट्या कामांतूनही चांगले परिणाम साधले जाऊ शकतात, दोन- शहरातील स्वच्छतागृहांच्या प्रश्‍नावर उपाय आहे, तीन- आपापल्या भागातल्या अशा नागरी समस्या चांगले लोक पुढे आल्यास सहज सुटू शकतात, इत्यादी.

सार्वजनिक सुविधा हा नक्कीच तेथील स्थानिक स्वराज्य संस्थांचा विषय आहे. त्या जबाबदारी टाळूच शकत नाहीत; परंतु एखादी मोठी सुविधा उभी राहिल्यास त्याची दुरवस्था होऊ नये, ही तितकीच नागरिकांची जबाबदारी आहे. यापुढील काळात नागरिकांच्या सहभागातूनच प्रश्‍न सुटू शकणार आहेत. चांगले लोक पुढे आले, तर अनेक समस्या सुटण्यास निश्‍चितपणे मदत होणार आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड या जुळ्या शहरांमध्ये असे अनेक चौक आहेत, जेथे वाहतुकीचा रोजच खोळंबा होत असतो. त्यामुळे तेथील प्रदूषण पातळीत तर वाढ होतेच, शिवाय त्या भागातील व्यवसायांवरही गंभीर परिणाम होत आहेत. अशा चौकांची जबाबदारी तेथील व्यावसायिकांनी घेतल्यास वाहतुकीचा प्रश्‍न सुटू शकेल. पुणे रोटरीअंतर्गत येणाऱ्या विविध क्‍लबनी एकत्र येऊन या दिशेने प्रयत्न सुरू केले आहेत; परंतु त्यांना स्थानिक नागरिक आणि व्यावसायिकांचीही साथ मिळणे आवश्‍यक आहे. त्याचप्रमाणे स्वच्छतेच्या प्रश्‍नावरही काही प्रमाणात तोडगा काढता येऊ शकेल. शहर आणि जिल्ह्यात अशी छोटी-छोटी मॉडेल विकसित केली तरी बरेचसे प्रश्‍न मार्गी लागू शकतात. त्यासाठी महापालिकेसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांनीही सकारात्मक दृष्टीने पाहायला हवे, कारण त्यांचाच भार कमी होणार आहे. शहरातील सर्व स्वच्छतागृहांच्या देखभालीसाठी ‘बीव्हीजी इंडिया’ने नाममात्र दरात सेवा देण्याचा प्रस्ताव हनुमंतराव गायकवाड यांनी ठेवला होता. पालिकेकडून त्याला चांगला प्रतिसाद मिळायला हवा होता. ‘दत्तक स्वच्छतागृहा’ला तीन वर्षे पूर्ण होण्याच्या निमित्ताने शहरासाठी अशा छोट्या-छोट्या मॉडेलचा जरूर विचार व्हायला हवा.

Web Title: Third Year Anniversary of Adopted Cleanliness