तहानलेल्या पक्ष्यांसाठी घरोघरी पाणपोई... 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 एप्रिल 2017

पुणे - उन्हाच्या कडाक्‍यामुळे आपल्या घशाला कोरड पडतीयं, तर मग पक्ष्यांचे काय होत असेल! तहानलेल्या पक्ष्यांची पाण्यासाठी होणारी वणवण थांबविण्यासाठी आता पक्षीप्रेमी पुढाकार घेऊ लागलेत. म्हणूनच गजबजलेल्या सिमेंटच्या जंगलात दाराबाहेर, खिडकीत किंवा अंगणात पक्ष्यांसाठी छोटे-मोठे कृत्रिम पाणवठे (वॉटर फिडर) तयार केल्याचे चित्र शहरात पहायला मिळत आहे. 

पुणे - उन्हाच्या कडाक्‍यामुळे आपल्या घशाला कोरड पडतीयं, तर मग पक्ष्यांचे काय होत असेल! तहानलेल्या पक्ष्यांची पाण्यासाठी होणारी वणवण थांबविण्यासाठी आता पक्षीप्रेमी पुढाकार घेऊ लागलेत. म्हणूनच गजबजलेल्या सिमेंटच्या जंगलात दाराबाहेर, खिडकीत किंवा अंगणात पक्ष्यांसाठी छोटे-मोठे कृत्रिम पाणवठे (वॉटर फिडर) तयार केल्याचे चित्र शहरात पहायला मिळत आहे. 

आपल्या अंगणात पक्ष्यांसाठी छोट्याशा पसरट भांड्यात पाणी ठेवायला अनेकांनी सुरवात केल्याने तिथं पक्ष्यांची शाळा भरू लागलीयं. काहीजण घरातील स्टील किंवा प्लॅस्टिकच्या भांड्यात पक्ष्यांसाठी पाणी ठेवत आहेत. त्यासाठी कोणी बाजारातून खास मातीची किंवा प्लॅस्टिकची भांडी विकत आणत आहेत. 

नेटिझन्सही सरसावले 
पक्ष्यांची तहान भागविण्यासाठी नेटिझन्सही सरसावल्याचे पहायला मिळते. फेसबुक, व्हॉट्‌सऍप, ट्‌विटरच्या मदतीने "पक्ष्यांसाठी राखून ठेवा पाण्याचा थेंब', "चिमण्यांसाठी पाणी ठेवा', अशा मोहिमांनी वेग घेतला आहे. बच्चे कंपनीनेदेखील या मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यायला मिळत असल्याचे चित्र आहे. काही ठिकाणी लहान मुले स्वत: "वॉटर फिडर्स' तयार करण्यात मग्न आहेत. 

पक्ष्यांसाठी पाणी ठेवण्याचे भांडे अधिक खोलगट नसावे. अशा भांड्यात छोट्या पक्ष्यांना उतरता येत नाही. तेरा कोटा प्लेट्‌सची उंची तुलनेने कमी असल्यामुळे त्यात पक्ष्यांसाठी पाणी ठेवले जात आहे. पाणी कमी झाल्यास पक्ष्यांना भांड्यात उतरून पाणी पिता येईल, असे भांडे ठेवावे. मातीबरोबरच आजकाल प्लॅस्टिकचे वॉटर फिडर बाजारात उपलब्ध आहेत. 
- विश्‍वजित नाईक, पक्षी निरीक्षक 

* पाणी ठेवताना घ्या ही काळजी : - 
- पाणी ठेवण्याचे भांडे खूप खोलगट नसावे 
- शक्‍यतो बशीच्या आकाराप्रमाणे भांडे असावे 
- भांड्यातील पाणी संपत नसल्यास दोन-तीन दिवसांनी ते बदलावे. 
- पक्ष्यांना अंघोळीचाही आनंद लुटता येईल, अशी भांड्याची रचना हवी 
- सुरक्षित ठिकाणी ही "वॉटर फिडर' ठेवावेत. 

* घरच्या घरी बनवा "वॉटर फिडर' 
तुम्ही घरातल्या टाकाऊ वस्तूंपासूनही पक्ष्यांसाठी "वॉटर फिडर' बनवू शकता. शहरातील पक्षिप्रेमी घरच्या घरी "वॉटर फिडर' बनविण्यासाठी वेगवेगळ्या क्‍लृप्त्या वापरू लागले आहेत. प्लॅस्टिकच्या बाटल्या, बरण्या, तार, दोरी, मातीचे भांडे, अशा सामग्रीचा वापर करून तुम्हालाही घरच्या घरी "वॉटर फिडर' बनविता येईल. अर्थात, त्याबद्दलच्या काही कल्पना तुम्हाला यू ट्यूबवरदेखील पहायला मिळतील. मातीच्या पाण्याच्या भांड्यासोबतच आता प्लॅस्टिकची भांडीदेखील बाजारात मिळू लागली आहेत. 

Web Title: Thirsty bird house

टॅग्स