अधिकाऱ्यांची मजा; गरिबांना सजा! पुणे महापालिकेचा दूजाभाव

health
health

पुणे : गरीब रुग्णांच्या उपचारासाठी महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट आहे. मात्र, नगरसेवक, अधिकाऱ्यांवरील उपचारांसाठी महापालिका सढळ हाताने खर्च करीत असल्याची बाब समोर आली आहे. शहरी गरीब योजनेतील रुग्णांवर उपचारांसाठी महापालिकेने तीन महिने पैसे दिले नाहीत, मात्र नगरसेवक आणि अधिकाऱ्यांच्या उपचारासाठी तब्बल 35 कोटी रुपये मोजले आहेत. 

आजी-माजी नगरसेवक आणि अधिकाऱ्यांच्या आठ महिन्यांतील उपचारांसाठी 35 कोटी रुपये खर्च झाला आहे. पुढील चार महिन्यांत तो सुमारे 15 कोटी रुपयांनी वाढून 50 कोटी रुपयांपर्यंत जाईल, असा अंदाज आहे. या घटकांसाठी एवढा खर्च होत असताना गरीब रुग्णांवरील उपचाराचे रुग्णालयांचे 18 कोटी रुपये महापालिकेने थकविले आहेत. त्यामुळे रुग्णालयांनी उपचार थांबविल्याने रुग्णांच्या जिवाशी खेळ होत आहे. 

अशा आहेत योजना? 
शहरी गरीब 
शहरातील एक लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न गटातील रहिवाशांसाठी ही योजना आहे. त्यातून कार्डधारकांना त्याच्या कुटुंबातील चार व्यक्तींच्या उपचाराचा शंभर टक्के खर्च दिला जातो. त्यासाठी वर्षाला किमान एक लाख रुपयांपर्यंतचा खर्च देण्यात येतो. मात्र, दुर्धर आजार विशेषत: कर्करोग आणि हदयविकाराच्या रुग्णांना दोन लाख रुपयांपर्यंतचा खर्च देण्याची तरतूद आहे. 

अंशदायी आरोग्य 
महापालिकेतील आजी-माजी नगरसेवक, अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी ही योजना आहे. या घटकांसह त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींना योजनेचा लाभ आहे. परंतु, या योजनेत उपचाराच्या खर्चाच्या मर्यादा नाही. एकूण बिलाच्या 90 टक्के रक्कम लाभार्थ्यांना दिली जाते. 

नेमके उपचार कोणावर? 
अंशदायी आरोग्य योजनेत नगरसेवक, अधिकारी दर महिन्याला आजारी पडल्यासही त्यांना तातडीने रुग्णालयामध्ये दाखल करून घेत उपचार मिळतात. या उपचाराची बिले तातडीने मंजूर करून देण्यात येतात. त्यामुळे यांच्या आरोग्याची फार काळजी महापालिका घेत असल्याचे दिसून येत आहे. बिले रुग्णालयाच्या नावाने दिली जात असताना नेमके उपचार कोणावर झाले, हे तपासण्याची यंत्रणा महापालिकेकडे नाही. त्यामुळे कोणाच्या नावावर कोणी उपचार घेतले हेही कळायला मार्ग नाही. दुसरीकडे बिले वेळेत मिळत असल्याने रुग्णालये फार खातरजमा करीत नाहीत. 

शहरी गरीब योजना (2019) 
लाभार्थी - 55 हजार व्यक्ती 
तरतूद  - 20 कोटी रुपये 
थकबाकी- 18 कोटी रुपये 

अंशदायी आरोग्य योजना (2019) 
लाभार्थी - संख्या उपलब्ध नाही 
तरतूद - 35 कोटी रुपये 
आठ महिन्यांतील खर्च  - 35 कोटी रुपये 

शहरी गरीब योजनेतील रुग्णांच्या उपचाराची थकबाकी पंधरा दिवसांत देण्याचे नियोजन केले आहे. शिवाय, तूर्त उपचार सुरू करण्याच्या सूचना रुग्णालयांना केल्या आहेत. अंशदायी योजनेसाठी पुरेसा निधी असतो, त्यातून बिले देण्यात येतात. या योजनेतून नेमक्‍या किती लोकांना लाभ होतो, याचा तपशील उपलब्ध करून देऊ. 
- डॉ. अंजली साबणे, सहाय्यक आरोग्य प्रमुख, महापालिका 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com