सदतीस हजार हेक्‍टर सिंचन क्षेत्र धोक्‍यात 

गजेंद्र बडे  
शुक्रवार, 14 जून 2019

नीरा देवघर धरणाच्या डाव्या कालव्याचे पाणी उजव्या कालव्यात वळविल्यास इंदापूर, बारामती आणि पुरंदर या तीन तालुक्‍यांतील सिंचनासाठीच्या पाण्यात पावणेपाच टीएमसीने कपात होणार आहे.

पुणे - नीरा देवघर धरणाच्या डाव्या कालव्याचे पाणी उजव्या कालव्यात वळविल्यास इंदापूर, बारामती आणि पुरंदर या तीन तालुक्‍यांतील सिंचनासाठीच्या पाण्यात पावणेपाच टीएमसीने कपात होणार आहे. परिणामी या तीनही तालुक्‍यांतील रब्बी आणि उन्हाळी आवर्तनात घट करावी लागणार आहे. यामुळे या तालुक्‍यांमधील 37 हजार 70 हेक्‍टर क्षेत्रावरील सिंचन धोक्‍यात येणार आहे. 

राज्य सरकारने नीरा उजव्या कालव्यातून इंदापूर, बारामती आणि पुरंदरसाठी सोडले जाणारे पाणी बंद करण्याचा निर्णय बुधवारी (ता. 12) घेतला आहे. या निर्णयामुळे नीरा डाव्या कालव्याद्वारे नीरा देवघर धरणातून सोडले जाणारे पाणी या तालुक्‍यांना मिळणार नाही, त्यामुळे या तालुक्‍यांना यापुढे केवळ भाटघर धरणातून सोडण्यात येणारेच सुमारे पावणेदहा टीएमसी (9.89 टीएमसी) पाणी सिंचनासाठी उपलब्ध होणार आहे. याउलट उजव्या कालव्यावर अवलंबून असणाऱ्या सातारा जिल्ह्यातील फलटण व खंडाळा आणि सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस, सांगोला आणि पंढरपूर या पाच तालुक्‍यांना मात्र 30.39 टीएमसी पाणी उपलब्ध होणार आहे. या पाच तालुक्‍यांतील सिंचन क्षेत्र हे 65 हजार हेक्‍टर इतके आहे. 

नीरा खोऱ्यात भाटघर, नीरा देवघर, गुंजवणी आणि वीर ही चार धरणे येतात. यापैकी भाटघर धरणाची उपयुक्त पाणी साठवण क्षमता 23.50 टीएमसी, नीरा देवघर 11.73 टीएमसी, वीरची 9.40 टीएमसी आणि गुंजवणीची 3.69 टीएमसी आहे. या चार धरणांचा मिळून एकूण 48.33 टीएमसी पाणीसाठा आहे. यापैकी गुंजवणीचे पाणी डाव्या किंवा उजव्या कालव्यासाठी वापरले जात नाही. त्यामुळे गुंजवणी वगळता उर्वरित तीन धरणांतील उपयुक्त पाणीसाठा हा 44.64 टीएमसी आहे. यापैकी पूर्वीपासूनच 25.66 टीएमसी पाणी नीरा उजव्या कालव्यातून सोडण्यात येत आहे. त्यात आता आणखी 4.73 टीएमसीची भर पडल्याने, यापुढे 30.39 टीएमसी पाणी हे उजव्या कालव्यासाठी उपलब्ध होणार आहे. याउलट यापुढे डाव्या कालव्याला मात्र केवळ 9.8 टीएमसी पाणी मिळू शकणार आहे. 

जिल्ह्याला फक्त 30 टक्केच पाणी 
राज्य सरकारच्या या निर्णयामुळे पुणे जिल्ह्यातील तीन तालुक्‍यांना पावणेदहा टीएमसी, तर उजव्या कालव्यावर अवलंबून असणाऱ्या सातारा व सोलापूर जिल्ह्यातील पाच तालुक्‍यांना मिळून 30.39 टीएमसी पाणी मिळणार आहे. नीरा खोऱ्यातील चार धरणांमधील एकूण उपयुक्त पाणीसाठा 44.64 टीएमसी आहे. यानुसार एकूण पाणीसाठ्यापैकी पुणे जिल्ह्याला केवळ तीस टक्के, तर सातारा व सोलापूर जिल्ह्याला सत्तर टक्के पाणी उपलब्ध होणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Thirty seven thousand hectares of irrigation are in danger