वीरमधून ३२ हजार क्‍युसेक विसर्ग

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 31 जुलै 2019

वीर (ता. पुरंदर) धरणातून मंगळवारी (ता. ३०) दुपारी दोन वाजता एकूण सात दरवाजे चार फुटांनी उचलण्यात आले असून, नीरा नदीत ३२ हजार ७४ क्‍युसेकने पाणी सोडण्यात आले.

परिंचे - वीर (ता. पुरंदर) धरणातून मंगळवारी (ता. ३०) दुपारी दोन वाजता एकूण सात दरवाजे चार फुटांनी उचलण्यात आले असून, नीरा नदीत ३२ हजार ७४ क्‍युसेकने पाणी सोडण्यात आले. वीर धरणात येणाऱ्या पाण्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने 

येत्या ४८ तासांत १.५ टीएमसी पाणी नीरा नदीपात्रात सोडण्यात आले. धरणातून होणाऱ्या विसर्गात २७ हजार ५५६ क्‍युसेक वाढ झाल्याचे सहायक अभियंता विजय नलावडे यांनी सांगितले. 

वीर धरणाचे तीन दरवाजे सोमवारी (ता. २९) संध्याकाळी चार वाजता चार फुटांनी उचलून नदीपात्रात १५ हजार क्‍युसेकने विसर्ग सुरू करण्यात आला होता. मंगळवारी (ता. ३०) पहाटे तीन वाजता धरणाचे आणखी दोन दरवाजे चार फुटांनी उचलून नदीपात्रात २३ हजार ११० क्‍युसेक पाणी सोडण्यात आले होते. पाणी पातळीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने दुपारी दोन वाजता आणखी दोन दरवाजे चार फुटांनी उचलून ३२ हजार क्‍यसुेक पाणी नीरा नदीपात्रात सोडण्यात आले.

चासकमानमधून विसर्ग वाढवला
चास - खेड तालुक्‍यातील चासकमान धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने धरणातून सोडण्यात येत असलेल्या पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला असून, भीमा नदीपात्रात १७ हजार ९५० क्‍युसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. धरण ९७.१५ टक्के भरलेले असल्याने अतिरिक्त ठरणारे पाणी लगेच नदीपात्रात सोडण्यात येत आहे. 

कुकडी प्रकल्पात ५१ टक्के साठा
नारायणगाव - कुकडी प्रकल्पात आज सायंकाळी चार वाजेपर्यंत ५१.२६ टक्के (१५.६५३ टीएमसी) उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. प्रकल्पातील येडगाव धरणात ९१.९१ टक्के (१.७८ टीएमसी) उपयुक्त पाणीसाठा झाला असून, पूर नियंत्रण करण्यासाठी धरणातून कुकडी नदी व कुकडी डावा कालव्यात आज दुपारपासून विसर्ग वाढविण्यात आला आहे. नदी काठच्या नागरिकांना कुकडी पाटबंधारे विभागाच्या वतीने सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

याबाबत कुकडी पाटबंधारे विभागाचे उपअभियंता बाळकृष्ण सावंत यांनी माहिती दिली, की कुकडी प्रकल्पात येडगाव, माणिकडोह, वडज, पिंपळगाव जोगे, डिंभे, चिल्हेवाडी धरण भागात संततधार पाऊस सुरू आहे. कुकडी प्रकल्पात आजअखेर १५.६५३ टीएमसी (५१.२६ टक्के) उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. येडगाव धरणात ९१ टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. धरणात ६ हजार क्‍युसेक आवक होत आहे. पूर नियंत्रण करण्यासाठी धरणातून कुकडी नदीत ४९०० क्‍युसेक व कुकडी डावा कालव्यात १५०० क्‍युसेक विसर्ग आज दुपारपासून सोडण्यात आला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Thirty two thousands of cusec discharges from Veer dam