Kasba Bypoll Election : ही तर स्टंटबाजी ! धंगेकरांनी आचारसंहितेचा भंग केल्याचा फडणवीसांचा आरोप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Devendra Fadanvis

Kasba Bypoll Election : ही तर स्टंटबाजी ! धंगेकरांनी आचारसंहितेचा भंग केल्याचा फडणवीसांचा आरोप

कसबा मतदार संघात मतदारांनी मतांसाठी पैसे घेतले असा आरोप काँग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांनी केला. हा कसब्यातील सगळ्या मतदारांचा अपमान आहे, हे सगळे आरोप बिनबुडाचे आहेत, अशी प्रतिक्रिया पुणे शहर भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी केला आहे. असे खोटे आरोप भाजपच्या उमेदवारावर करुन फक्त सहानुभूती निर्माण करण्याचं काम ते करत असल्याचंही मुळीक म्हणाले आहेत.

त्यानंतर यासंदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीका करत उत्तर दिलं आहे. काँग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर हे उपोषण करून पॉलिटिकल स्टंट असल्याचंही फडणवीस यांनी म्हंटलं आहे.

रवींद्र धंगेकर यांच्या आरोपवर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "स्पष्टपणे दिसून येत आहे की, आज कुठल्याही प्रकारचा प्रचार करता येत नाही हे माहिती असताना अशा प्रकारचा स्टंट करून एक नवीन प्रकारे प्रचार करण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. पायाखालून जेव्हा वाळू निघून जाते त्यावेळी असे स्टंट केले जातात. हे आचार संहितेचे उल्लंघन आहे."

पुढे फडणवीस म्हणाले की, "पैसे वाटणे हे राष्ट्रवादी आणि काँग्रेसची संस्कृति आहे. पैसे वाटणे ही भाजपची संस्कृति नाही. आमचा मतदारही असा नाही. जो पैसे घेऊन मतदान करेल. मतदारांचा अवमान करण्याचे काम आहे. धंगेकर यांचं हे उपोषण भाजपविरुद्ध नाही तर हे उपोषण मतदारांच्या विरुद्ध आहे कारण ते मतदारांना बिकावू ठरवत आहेत. हे अतिशय चुकीच आहे. देव त्यांना सुबूदधी देवो असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटलं आहे.

भारतीय जनता पक्षाने पोलिसांना सोबत घेऊन पैसे वाटप केल्याचा आरोप काँग्रेसचे कसबा मतदारसंघाचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी केला आहे. याचा निषेध करण्यासाठी धंगेकर आज कसबा गणपतीसमोर उपोषण करत आहेत. कसबा पेठेतील रविवार पेठ, गंजपेठ आणि बहुतांश भागात भाजपकडून पैशाचे वाटप सुरू केले आहे. या संपूर्ण प्रकारात पोलिसही सहभागी असल्याचा आरोप धंगेकर यांनी केला आहे. त्यावर भाजपने हल्लाबोल केला आहे.