
Pune : मुठभर लोकांच्या हातात संपत्ती म्हणजे नवा भारत नव्हे - हुसेन दलवाई
कात्रज : मुठभर लोकांच्या हातात संपत्ती म्हणजे नवा भारत नव्हे, नव्या भारताची सुरवात माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, स्व. इंदिरा गांधी आणि स्व. राजीव गांधी यांनी केली होती, असे मत माजी खासदार आणि काँग्रेसचे नेते हुसेन दलवाई यांनी व्यक्त केले. स्व. राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमीत्त राजीव गांधी स्मारक समितीकडून आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात आदरांजली वाहताना ते बोलत होते.
दलवाई म्हणाले, 'आधुनिक जगाशी संपूर्ण देश जोडण्याचे काम राजीव यांनी केले. गरीब व्यातीच्या हातात आलेला फोन हा त्यांनी आणला आहे, ही लक्षात घेण्याची गरज आहे. त्यावेळी त्यांनी आणलेल्या संगणक क्रांतीवर अनेकांनी टीका केली. परंतु, आता संगणकाशिवाय पर्याय नाही. आज राजकारणात महिला पुढे आहेत, त्याचे श्रेय राजीव गांधी यांनी पहिल्यांदा महिलांना ३० टक्के आरक्षण दिले याचे आहे.
यावेळी राजीव गांधी स्मारक समितीचे अध्यक्ष गोपाळ तिवारी, आमदार संजय जगताप, कमल व्यवहारे, राजाभाऊ खराडे, भूषण रानभरे, धनकवडी सहकारनगर क्षेत्रिय कार्यालयाच्या सहायक आयुक्त सुरेखा भणगे, प्राणीसंग्रहालयाचे संचालक राजकुमार जाधव, मुख्य आरोग्य निरीक्षक राजू दुलम्म, आरोग्य निरीक्षक प्रमोद ढसाळ उपस्थित होते.
संजय जगताप म्हणाले, 'राजीवजींनी देशासाठी दिलेल्या बलिदानाचे हे ३२ वे वर्ष असून २१ व्या शतकातील नवी दिशा आणि प्रगतिशील भारताची पायाभरणी त्यांनी केली. त्यांच्या बलिदानामुळेच देशाला दिशा मिळाली आहे. गोपाळ तिवारी यांनी प्रास्ताविकात स्वातंत्र्योत्तर भारताच्या इतिहासातील हा काळा दिवस असून संगणकक्रांती आणि दिशादर्शक नेतृत्वाची त्यावेळी हत्या झाली. त्यांच्या सात वर्षाच्या काळात देशाचा विकासाचा आलेख सर्वाधिक होता, असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाच्या शेवटी सूर्यकांत मारणे यांनी आभार मानले.