मराठी कविता आवर्तात सापडली आहे 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 डिसेंबर 2016

पुणे : 'ज्या गोष्टीत नवनवे प्रयोग होत नाहीत, ती गोष्ट आवर्तात सापडते. मराठी कवितेचेही असेच झाले आहे. ती आवर्तात सापडली आहे. त्यामुळेच उथळ कविता सध्या मोठ्या प्रमाणात तयार होत आहे,'' अशी खंत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष उत्तम कांबळे यांनी शनिवारी व्यक्त केली. कविता हे अतिशय गांभीर्याने वापरायचे आयुध आहे, असेही ते म्हणाले. 

'ग्रंथाली'तर्फे आयोजित सोहळ्यात साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशीलिखित 'मथितार्थ', 'इत्यादि' या कवितासंग्रहांचे प्रकाशन कांबळे यांच्या हस्ते झाले. संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, लेखिका डॉ. अश्‍विनी धोंगडे, सचिन इटकर उपस्थित होते. 

कांबळे म्हणाले, ''कवी संमेलनात कविता वाचण्याऐवजी ती गायली जाते. म्हणजे गाणे हा कविता खपविण्याचा मार्ग आहे का? खरं तर कविता हे जग बदलणारे माध्यम आहे. तिच्याकडे आपण गांभीर्याने पाहायला हवे; पण सध्या तसे होताना दिसत नाही. स्वत:ला नवकवी म्हणवून घेणारे आजचे कवी कवितेची चेष्टा करत आहेत. अशा अस्वस्थतेच्या काळात डॉ. जोशी यांची कविता दीपस्तंभाप्रमाणे आपल्यासमोर उभी आहे. या कवितेचा नव्या कवींनी अभ्यास करावा.'' 

सबनीस म्हणाले, ''आपल्याला व्यक्तिनिष्ठ, जातिनिष्ठ, धर्मनिष्ठ कविता पाहायला मिळतात. खरं तर यापलीकडे जाऊन कवितेने मानवी कल्याणाचे सूत्र मांडले पाहिजे. डॉ. जोशी यांची कविता कुठल्याही चौकटीत न अडकता मानवतावादाचा संदेश देते.'' 

उद्धव कानडे यांनी सूत्रसंचालन केले. 

लेखक व्यवस्थेचे दलाल होणार? 
''लेखकांना मानधन, संमेलनाचे व्यासपीठ, साहित्य अकादमीपासून 'ज्ञानपीठ'पर्यंतचे पुरस्कार हवेत. जाईल तेथे मान-सन्मान हवा. याचा अर्थ लेखक व्यवस्थेचे दलाल होणार का, हा खरा प्रश्‍न आहे. लेखकांनी ही मानसिकता बदलायला हवी. अशाने लेखकाचे शब्द हरवतील,'' अशी खंत श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी व्यक्त केली.

Web Title: Thoughts by Uttam Kamble on Marathi Poems