प्रतिपंढरीत विठ्ठलनामाचा गजर 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 13 जुलै 2019

"सुख, शांती, समृद्धी नांदू दे; पाऊस चांगला पडू दे, सगळीकडे सुजलाम्‌ सुफलाम्‌ होऊ दे' असे साकडे विठ्ठलाकडे घालण्यासाठी आज पहाटेपासून भाविक रांगेत उभे होते.

सिंहगड रस्ता - "सुख, शांती, समृद्धी नांदू दे; पाऊस चांगला पडू दे, सगळीकडे सुजलाम्‌ सुफलाम्‌ होऊ दे' असे साकडे विठ्ठलाकडे घालण्यासाठी आज पहाटेपासून भाविक रांगेत उभे होते. हजारो भाविकांनी प्रतिपंढरी समजल्या जाणाऱ्या विठ्ठलवाडीत विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेतले. 

विठ्ठल-रखुमाई देव ट्रस्टच्या वतीने महापूजेचे आयोजन केले होते. रात्री दोन वाजता महापूजेस सुरवात झाली. साडेतीनला पूजेनंतर काकड आरती झाली. त्यानंतर चारला मंदिर खुले करण्यात आले. गोसावी परिवारातील विशाल गोसावी आणि मधुरा गोसावी यांच्या हस्ते पूजा झाली. 

दशमीच्या कार्यक्रमात अनेक गायकांनी सेवा रुजू केली, कीर्तन- भजनाने कार्यक्रमाची सांगता झाली. त्यांनतर त्रयोदशीच्या दिवशी काल्याचा कार्यक्रम होऊन आषाढी वारीची सांगता होणार आहे. 

सतीश धोंडिबा मिसाळ प्रतिष्ठानच्या वतीने साबुदाणा खिचडीचे वाटप करण्यात आले. श्री शांतीसेवा प्रतिष्ठानच्या वतीने विविध रोपांचे वाटप केले, तर वृत्तपत्र विक्रेता संघाच्या वतीने राजगिरा लाडूचे वाटप केले. शशितारा प्रतिष्ठान आणि नगरसेवक श्रीकांत जगताप यांच्या वतीने भाविकांसाठी मोफत रिक्षाची सोय करण्यात आली होती. तसेच, नगरसेवक प्रसन्न जगताप यांच्या वतीने प्रसादाचे वाटप करण्यात आले. त्याचबरोबर शिवसैनिक बापू निंबाळकर, खडकवासला कॉंग्रेसच्या वतीने स्वागत कक्ष उभारण्यात आले होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने भाविकांसाठी मोफत चप्पल स्टॅंड उभारले होते, तर महापालिकेच्या वतीने हिरकणी कक्ष, स्वागत कक्ष, साहाय्यता कक्ष, फिरता दवाखाना आणि विविध सोयी उपलब्ध करून दिल्या होत्या. यंदा धरण भरल्याने नदीत पाणी सोडण्यात आले होते, त्यामुळे नदीतील पुंडलिकाच्या मंदिराच्या पायथ्याशी पाणी आले होते. दर्शनासाठी भाविकांच्या सकाळपासूनच रांगा लागल्या होत्या. हजारो भाविकांनी उत्साहात विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेतले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Thousands of devotees took darshan of Vitthal-Rakhumai in Vitthalwadi