इंद्रायणीत हजारो माशांचा मृत्यू 

इंद्रायणीत हजारो माशांचा मृत्यू 

चिखली(पुणे): तीर्थक्षेत्र देहू येथे इंद्रायणी नदीपात्रातील पाणी दूषित झाल्याने रविवारी (ता. 9) हजारो माशांचा मृत्यू झाला. इंद्रायणी नदीत हजारोंच्या संख्येत मासे मृत होण्याची ही पहिलीच घटना आहे. या धक्कादायक घटनेमुळे नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे. या प्रकारामुळे काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या पालखी सोहळ्यासाठी येणाऱ्या भाविकांच्या जिवालाही धोका निर्माण होण्याची शक्‍यता आहे, त्यामुळे प्रशासनाने या घटनेची गांभीर्याने दखल घ्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.दरम्यान, देहू संस्थान व ग्रामस्थांतर्फे सायंकाळी मृत माशांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. 

इंद्रायणी नदी परिसरात रविवारी सकाळी फिरण्यास गेलेल्या नागरिकांना मासे मृत झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर देहू संस्थान आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने मृत मासे नदीबाहेर काढण्यास सुरवात केली. या वेळी हजारो मासे मृत झाल्याचा प्रकार उघड झाला. ग्रामस्थांनी हे मासे काढून देहू येथील घाटावर ठेवले. पाण्याच्या तपासणीनंतरच याबाबत नेमके कारण समजू शकेल. परंतु, या प्रकाराबाबत अनेक तर्क लावले जात आहेत. 

देहू परिसर झपाट्याने विकसित होत आहे. त्यामुळे लोकसंख्येत मोठी वाढ होत आहे. मात्र, सांडपाणी, रस्ते, गटारे आदी मूलभूत सुविधांमध्ये सुधारणा होताना दिसून येत नाही. गेल्या चार वर्षांपासून तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत चौदा कोटी रुपये खर्चून मैलाशुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात येत आहे. परंतु, हा प्रकल्प पूर्ण न झाल्याने सध्या गावातील सांडपाणी सरळ नदीपात्रात सोडले जाते. त्यातच तळेगाव, इंदोरी आदी भागांतील कारखान्यांतून रसायनमिश्रित पाणी सोडल्याने प्रदूषणात मोठी वाढ झाल्याचे नागरिकांनी सांगितले.

देहू येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. किशोर यादव म्हणाले, ""नदीतील मृत माशांचे नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत. राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचा अहवाल येईपर्यंत नदीतील मासे खाऊ नयेत, तसेच मासे विकू नयेत. याशिवाय वारकऱ्यांनी नदीच्या पाण्याचा तीर्थ म्हणून किंवा अंघोळीसाठी वापर करू नये.'' देहू संस्थानचे अध्यक्ष संजय मोरे म्हणाले, की पालखी सोहळा तोंडावर आला आहे. दूषित पाण्यामुळे भाविकांच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो. प्रशासनाने याची त्वरित दखल घेऊन उपाययोजना कराव्यात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com