मतदान बंदोबस्तासाठी साडेपाच हजार पोलिस

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 फेब्रुवारी 2017

पुणे - जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुकीची मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्यासाठी सुमारे साडेपाच हजार पोलिस अधिकारी आणि कर्मचारी तैनात करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक सुवेझ हक यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.

पुणे - जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुकीची मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्यासाठी सुमारे साडेपाच हजार पोलिस अधिकारी आणि कर्मचारी तैनात करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक सुवेझ हक यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी २१ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. तर २३ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे. या अनुषंगाने पोलिस बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. या संदर्भात सुवेझ हक म्हणाले, ‘‘जिल्ह्यातील १३ तालुक्‍यांमध्ये जिल्हा परिषदेचे ७५ गट आणि पंचायत समितीच्या दीडशे गणांचा समावेश आहे. जिल्ह्यात एकूण तीन हजार ४४४ मतदान केंद्र आहेत. जिल्ह्यातील पोलिस मनुष्यबळासोबतच औरंगाबाद, बीड आणि जालना जिल्ह्यातूनही मनुष्यबळ मागविण्यात आले आहे. याशिवाय, राज्य राखीव पोलिस दलाच्या (एसआरपीएफ) दोन तुकड्या, शीघ्र कृती दल आणि दंगल विरोधी पथकांची नेमणूक केली आहे. जुन्नर, मावळ, हवेली, दौंड, भोर आणि इंदापूर तालुक्‍यांत एसआरपीएफच्या तुकड्या तैनात राहतील.’’ 

जिल्ह्यात एकूण १७१ संवेदनशील मतदान केंद्र असून, तेथे अतिरिक्‍त बंदोबस्त राहील. पोलिस गस्तीसाठी दीडशे वाहने आणि प्रत्येक ठाण्यातील पोलिस निरीक्षक, उपअधीक्षक आणि त्यावरील दर्जाच्या अधिकाऱ्यांना ‘स्ट्रायकिंग फोर्स’ देण्यात आला आहे. ऐनवेळी परिस्थिती उद्‌भवल्यास ती नियंत्रण आणण्यासाठी हा फोर्स मदतीला असेल. पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी ५६ मतदान केंद्रांवर पुणे ग्रामीण पोलिसांकडून बंदोबस्त ठेवण्यात येणार असल्याचे हक यांनी सांगितले. 

सराईत गुन्हेगारांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत आहे. आचारसंहिता लागू झाल्यानंतर कायदा व सुव्यवस्थेत अडथळा आणणाऱ्या तसेच गुन्हेगारांविरुद्ध कारवाई केली आहे. ४३ सराईत गुन्हेगारांना तडीपार केले आहे. तसेच, एमपीडीए कायद्यांतर्गत तिघांना स्थानबद्ध केले आहे. खेड आणि पौड पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोन गावठी कट्टे आणि काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. जिल्ह्यात चार हजार शस्त्र परवानाधारक असून, तीन हजार ६६८ जणांना शस्त्र जमा करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यापैकी तीन हजार ६५७ जणांनी शस्त्र जमा केल्याचे त्यांनी सांगितले.

बंदोबस्ताचे नियोजन
 पोलिस अधीक्षक -       १
 अतिरिक्‍त अधीक्षक -       २
 पोलिस उपअधीक्षक -  १३
 पोलिस निरीक्षक -       ५८
 सहायक निरीक्षक,   
     उपनिरीक्षक -              १८९
 पोलिस कर्मचारी -  ३७०४
 एसआरपीएफ कंपनी -  २
 वनरक्षक -    ७१
 वाहने -                 २०४
 क्‍यूआरटी पथक -        १ 
 दंगल नियंत्रण पथक - २

Web Title: Thousands of police deployed for poll claimed