निमसाखरमध्ये वरुणराज्याच्या साक्षीने हजारो सिडस् बॉलची निर्मिती

राजकुमार थोरात
सोमवार, 16 जुलै 2018

वरुणराज्याच्या साक्षीने निमसाखर (ता.इंदापूर) येथे निमसाखर एज्युकेशन सोसायटीच्या एनईएस हायस्कुल व ज्युनिअर कॉलेजमध्ये शरयू फाउंडेशनच्या अध्यक्षा शर्मिला पवार यांनी विद्यार्थ्याकडून हजारो शिडस बॉलची निमिर्ती करुन घेतली.
 

वालचंदनगर - वरुणराज्याच्या साक्षीने निमसाखर (ता.इंदापूर) येथे निमसाखर एज्युकेशन सोसायटीच्या एनईएस हायस्कुल व ज्युनिअर कॉलेजमध्ये शरयू फाउंडेशनच्या अध्यक्षा शर्मिला पवार यांनी विद्यार्थ्याकडून हजारो शिडस बॉलची निमिर्ती करुन घेतली.

शरयू फाउंडेशनने पर्यावरणाचे रक्षण करुन जास्तीत जास्त झाडांची लागवड करण्यासाठी शिडस् बॉल निर्मितीचा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत हजारो शिडस् बॉल तयार करुन पावसाळ्यामध्ये गावातील गावठाण जागा, शाळा-महाविद्यालये, शासकीय कार्यालये, ओढे, रस्त्याच्या रिकाम्या जागा, स्मशानभूमीमध्ये ठेवले जातात. शिडस् बॉल तयार केल्यानंतर आठ ते दहा दिवसामध्ये त्याला अंकुर येत असतो. आज सोमवार (ता.16) रोजी शर्मिला पवार यांनी शाळेतील शेकडो मुलांसह सिडस् बॉल निर्मितीचा उपक्रम राबविला.

शरयू फाउंडेशनच्या वतीने मातीमध्ये शेणाचे मिश्रण तयार करुन विद्यार्थ्याना दिले. पवार यांच्यासह मुलांनी गोलाकार गोळे तयार करुन त्यांच्यामध्ये करंज, चिंच व कडूनिंबाच्या बियांचे राेपन केले. या उपक्रमामध्ये शाळेतील सुमारे एक हजार विद्यार्थ्यानी सहभाग घेतला. आज दिवसभर पावसाची रिमझिम सुरु असल्याने पावसामध्ये भिजत-भिजत सिडस् बॉल तयार करण्यात आले. आठ-दहा दिवसानंतर तयार झालेले सिडस् बॉल शरयू फाउंडेशनच्या वतीने रोपन करण्यात येणार आहे. या उपक्रमामध्ये शरयू फाउंडेशनचे सदस्य अनिल काटे, महादेव कचरे, राहुल घुले, विजयसिंह रणवरे, शुभम निंबाळकर,वीरसिंह रणसिंग,सागर मिसाळ  उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन निमसाखर एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्ष सुशिला रणवरे, सचिव रविंद्र रणवरे, शाळा समितीचे अध्यक्ष डाॅ.एन.जी.रणवरे, अरुणा रणवरे, मुख्याध्यापक नवनाथ बागल यांनी केले.

सिडस् बाॅल निर्मितीमध्ये वारकऱ्यांचाही सहभाग
कामथडी (ता.भोर) येथील सद्गुरु आनंदाश्रम स्वामी यांचा पालखी सोहळा पंढरपूरकडे जात असताना आज दुपारचा विसावा शाळेमध्ये होता. पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांनी ही सिडस् बॉल निर्मितीच्या उपक्रमामध्ये सहभाग घेवून सिडस् बॉलची निर्मिती केली. वृक्षवल्ली आम्हा सोयरेचा अनोखा संदेश दिला.

Web Title: thousands of Sids Ball produced in Nimsakar