लाखोंचा ऐवज चोरणाऱ्या नेपाळच्या चोरट्यांना अटक 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 18 नोव्हेंबर 2018


नागरिकांनी सुरक्षारक्षक आणि घरकामास असलेल्या कामगारांचा पत्ता, मोबाईल क्रमांकासह संपूर्ण माहिती स्वत:कडे ठेवावी. तसेच त्यांची नजीकच्या पोलिस ठाण्यातून चारित्र्य पडताळणी करून घेणे बंधनकारक आहे. 

- शिरीष सरदेशपांडे, पोलिस उपायुक्‍त, गुन्हे शाखा 

पुणे : एका बांधकाम व्यावसायिकाच्या बंगल्यातून हिरेजडित सोन्याच्या दागिन्यांसह 35 लाखांचा ऐवज चोरणाऱ्या नेपाळ येथील चोरट्यांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी उत्तर प्रदेशातून अटक केली. अन्य चौघे जण फरारी असून, त्यांचा शोध घेण्यात येत आहे. त्यांच्या ताब्यातून सुमारे 19 लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्‍त शिरीष सरदेशपांडे यांनी दिली. 

याप्रकरणी आशिष भंवरलाल जैन (वय 39, रा. कुंदन इस्टेट, बोपोडी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून खडकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर केशर प्रेम साही (वय 23, मूळ रा. मालकेट, जि. कालिकोट), नेपाळ आणि कृष्णा ब्रिकबहादूर शाह (वय 35, रा. रामा रोशन, नेपाळ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. केशर साही याच्यासह तिघे जण जैन यांच्या बंगल्यावर काही महिन्यांपासून घरकामास होते. जैन कुटुंबीय 10 नोव्हेंबर रोजी भीमाशंकर येथे देवदर्शनासाठी गेले होते. ही संधी साधून चोरटे बंगल्यातून दागिने आणि पावणेसात लाखांची रोकड घेऊन पसार झाले. 

गुन्हे शाखेचे सहायक आयुक्‍त समीर शेख यांच्यासह वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र कदम, मुरलीधर करपे, अंजुम बागवान, जयराम पायगुडे यांच्या पथकाने तपास सुरू केला. मुंबईतील नेपाळी व्यक्‍तींकडून मिळालेली माहिती आणि तांत्रिकदृष्ट्या तपासाच्या आधारे चोरटे मथुरा, रतलाम, दिल्ली, भरतपूर, फरिदाबादमार्गे जात असल्याची माहिती मिळाली. ते नेपाळला जाण्याची शक्‍यता असल्यामुळे पोलिसांनी दिल्ली येथे तपासासाठी गेलेल्या येथील सायबर गुन्हे शाखेच्या पथकाची मदत घेतली.

चोरटे गाझियाबादमार्गे नेपाळला ट्रॅव्हल्सने जात होते. पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून उत्तर प्रदेशातील बाबूगड (जि. हापूड) येथे अटक केली. शहरात गेल्या वर्षभरात नेपाळ येथील चोरट्यांकडून घरफोडीच्या चार घटना घडल्या आहेत. 

Web Title: Thousands of thieves stole Nepalese arrested