कडबनवाडीत वन्यजीवांच्या अधिवासास पर्यटकांकडून धोका

KET
KET

प्राणी जवळून पाहण्यासाठी चारचाकींचा सापळा

निमगाव केतकी (पुणे) : कडबनवाडी (ता. इंदापूर) माळरानावरील वन्यजीवांच्या अधिवासास हौशी पर्यटकांकडून धोका निर्माण होत आहे. लांडगा, तरस जवळून बघण्यासाठी अतिउत्साही हौशी पर्यटक तीन ते पाच हजार रुपये मोजत आहेत. हे प्राणी पाहण्यासाठी चारचाकी गाड्यांचा सापळा रचला जातो. ही बाब अतिशय गंभीर असताना वनविभाग याकडे काणाडोळा का करत आहे, असा सवाल फ्रेंड्‌स ऑफ नेचरच्या सदस्यांनी केला आहे.

कडबनवाडीच्या विस्तीर्ण वनीकरणात चिंकारा, लांडगे, कोल्हे, तरसासह अन्य प्राणी तसेच गरुडासह विविध पक्षी मोठ्या संख्येने आहेत. "फ्रेंड्‌स ऑफ नेचर'चे कार्यकर्ते मागील पंधरा वर्षांपासून येथील पशुपक्ष्यांच्या संवर्धनासाठी प्रयत्न करीत आहेत. अलीकडे वन विभागाने वन्यजीवांच्या पाण्यासाठी विविध सुविधा निर्माण केल्या आहेत. पर्यटक वाढीसाठी प्रयत्न करत आहे. मात्र, वाढलेल्या या पर्यटकांकडून अलीकडे वन्यजीवांना उपद्रव वाढल्याचे दिसत आहे. मोठ्या शहरांतील हौशी पर्यटक पहाटे या भागात येतात. लांडगा, तरस जवळून दाखविण्यासाठी भिगवण भागातील काही जण या पर्यटकांना पहाटे येथे घेऊन येतात. त्यांच्याकडून तीन ते पाच हजार घेतात. ही गोष्ट "फ्रेंड्‌स ऑफ नेचर'च्या सदस्यांच्या लक्षात आल्यानंतर रविवारी (ता. 1) ते त्यांच्यासमवेत कडबनवाडी भागात पहाटे गेल्यानंतर ही बाब किती गंभीर आहे, याची कल्पना आली.

पुणे, कोल्हापूरसह अन्य शहरातील दहा ते बारा चारचाकी गाड्या पहाटेपासून माळावर उभ्या होत्या. ज्या भागात लांडग्याचा अधिवास होता. त्याच्या तीन बाजूने काही अंतरावर गाड्या व आतमध्ये पर्यटक बसलेले दिसले. लांडगा जवळ आल्यानंतर त्याचा फोटो काढण्यासाठी हे पर्यटक वाट पाहत बसतात. बऱ्याचदा जे हा व्यवसाय करतात, ते लांडग्याला हुसकावून त्या गाडीपर्यंत आणत असल्याचेही कळाले.

"पर्यटकांचा वन्यजीवांशी खेळ'
फ्रेंड्‌स ऑफ नेचरचे वैभव जाधव, ऍड. सचिन राऊत, ऍड. श्रीकांत करे म्हणाले, ""मागील काही दिवसांपासून मौजमजा करण्यासाठी आलेले पर्यटक वन्यजीवांशी खेळत आहेत. ही बाब फारच गंभीर आहे. वन्यजीवांचा विचार न करता काहीजण फक्त पैसे मिळविण्यासाठी हे कृत्य करीत आहेत. मुख्य रस्त्याच्या आत चारचाकी गाड्या गेल्या नाही पाहिजेत; परंतु सर्व नियम धाब्यावर बसवून सर्वत्र रस्ते केले जात आहेत. वनविभागाने याचा तातडीने बंदोबस्त करावा.''

वनविभागाचे नियम धुडकावून जे पर्यटक वन्यप्राण्यांना त्रास देताना आढळल्यास त्यांच्यावर त्वरित वनगुन्हे दाखल करण्यात येतील. पर्यटकांनीही नियमांचे पालन केले पाहिजे.
-राहुल काळे,
वनक्षेत्रपाल,इंदापूर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com