
Pune Crime News : जमीन मोजणीसाठी गेलेल्या महिलेला धमकावले, गुन्हा दाखल
पुणे : जागेचे खरेदीखत झाल्यानंतरही मूळ जमीन मालकाने जागा बळकावण्याचा प्रयत्न करून जमीन मोजणीसाठी गेलेल्या फिर्यादी महिलेला धमकावण्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी मीरा रोझरियो बरेटो (वय ६३, रा. टिंगरेनगर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून दादा बबन सातव (रा. वाघोली) यांच्यासह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी बरेटो यांनी मूळ मालकाकडून आव्हाळवाडी येथील चार हेक्टर ४८ आर जमीन सन २०११ मध्ये खरेदीखत करून घेतले आहे.
तसेच, त्यांचा भाऊ नरेंद्र देत्री यांच्या नावे २०१३ मध्ये २० आर जमिनीचे खरेदीखत झाले आहे. हा संपूर्ण व्यवहार धनादेशाद्वारे झालेला आहे. फिर्यादीने या जमिनीची सरकारी मोजणी करण्यासाठी भूमी अभिलेख कार्यालयात अर्ज दिला होता. तसेच, जागेची मोजणी करताना पोलिस बंदोबस्तही मंजूर केला होता.
त्यानुसार फिर्यादी कर्मचाऱ्यांसोबत मोजणी करण्यासाठी गेल्यानंतर त्यांना शिवीगाळ करून धमकावण्यात आले. तसेच, मूळ मालकांकडून या जागेवर मालकी हक्कासंदर्भात फलक लावून अतिक्रमण केले आहे, असे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजानन पवार करीत आहेत.