व्यापाऱ्याला ठार मारण्याची धमकी; आशा गवळी रडारवर

डी. के. वळसे पाटील
बुधवार, 18 एप्रिल 2018

मंचर (पुणे): लोणी (ता. आंबेगाव) येथील व्यापाऱ्याला मोबाईलवरून जीवे ठार मारण्याची धमकी देऊन पाच लाख रुपयांची खंडणी मागितल्याच्या आरोपावरून पुणे ग्रामीण पोलिस गुन्हा अन्वेशन विभागाच्या पथकाने तीन जणांना अटक केली असून आरोपी अरुण गवळी टोळीशी संबंधित आहेत. मम्मीचा या गुन्ह्याला पाठींबा असल्याचे पोलिस तपासात आढळून आल्याने आशा गवळी पोलिसांच्या रडार केंद्रावर आहे.

मंचर (पुणे): लोणी (ता. आंबेगाव) येथील व्यापाऱ्याला मोबाईलवरून जीवे ठार मारण्याची धमकी देऊन पाच लाख रुपयांची खंडणी मागितल्याच्या आरोपावरून पुणे ग्रामीण पोलिस गुन्हा अन्वेशन विभागाच्या पथकाने तीन जणांना अटक केली असून आरोपी अरुण गवळी टोळीशी संबंधित आहेत. मम्मीचा या गुन्ह्याला पाठींबा असल्याचे पोलिस तपासात आढळून आल्याने आशा गवळी पोलिसांच्या रडार केंद्रावर आहे.

मोबीन मेहमूद मुजावर (वय 28, रा. दगडी चाळ, भायखळा मुंबई मूळ रा. वडगाव पीर ता. आंबेगाव जि.पुणे), सुरज राजेश यादव (वय 20, रा. वडगाव पीर), बाळा सुदाम पठारे (वय 37, रा. चंदननगर, पुणे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. आरोपींना घोडेगाव न्यायालयाने सोमवार (ता. 23) पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.

सदर फिर्यादी व्यापाऱ्याचे लोणी येथे कापड व चंदननगर येथे ड्राय फ्रूटचे दुकान आहे. सुरवातील लोणी येथील दुकानावर जाऊन सुरज यादव याने धंदा व्यवस्थित करायचा असेल तर मला हप्ता द्यावा लागेल. असा व्यापाऱ्याला निरोप दोन वेळा दिला. शुक्रवारी (ता. 13 ) चंदननगर येथील दुकानात येऊन बाळू पठारे याने मला वडगाव पीर येथून मम्मीने हप्प्त्याचे पैसे घेण्यासाठी पाठविले आहे, असे सांगितले. त्यावेळी समोरून मोबाईलहून मोमीन मुजावरही दमदाटीच्या भाषेत व्यापाऱ्याबरोबर बोलला. शनिवारी (ता. 14) लोणी येथे यादव आला. हप्ता न मिळाल्यास दोन दिवसात दुकानाची तोडफोड करून जीवे मारू. अशी धमकी दिली. मुंबईला मम्मीला भेटायला ये. असा दम देऊन निघून गेला. रविवारी (ता. 15) रात्री मोबाईल आला. “तू मुंबईला पैसे घेऊन का आला नाही. आम्ही कुणालाही सोडत नाही. लोणीच्या सरपंचासारखी गत करून घेऊ नको.’’ पुन्हा दहा मिनिटांनी फोन आला. “प्रेमाने रक्कम द्या. आम्ही तुम्हाला प्रोटेक्शन देऊ. काही त्रास झाला तर मदत करू.’’ सोमवारी (ता. 16) दुपारी यादवचा फोन आला. “डॅडी आज येणार आहे. रक्कमेची तजबीज न केल्यास चांगले परिणाम होणार नाहीत.’’ याबाबत व्यापाऱ्याने मंचर पोलिस ठाण्यात मंगळवारी (ता. 17) फिर्याद दाखल केली.

गुन्ह्याचे गांभीर्य पाहून पोलिस अधीक्षक सुवेझ हक्क यांनी गुन्हा अन्वेशन विभागाचे पोलिस निरीक्षक दयानंद गावडे यांच्याकडे गुन्हा तपासासाठी दिला. सहाय्यक पोलिस निरीक्षक नीलकंठ जगताप, गणेश क्षीरसागर, पोलिस उपनिरीक्षक महेश मुंढे, सहायक फौजदार दत्ता गिरमकर, सुनील बांदल पोलिस हवालदार दत्ता जगताप, राम जावळे, शंकर जम, शरद बांभले, महेश गायकवाड, सचिन गायकवाड, पोपट गायकवाड, विशाल साळूखे, निलेश कदम, सागर चंद्रशेखर, चंद्रकांत मगर, नितीन भोर, नितीन दळवी, रवी शिनगारे, प्रमोद नवले यांनी आरोपींचा शोध घेऊन अटक केली.

गवळी गॅंग अथवा इतरांनी खंडणी मागितली किंवा घेतली असल्यास पुणे जिल्ह्यातील व्यापारी, कारखानदार यांनी न घाबरता पोलिसांकडे येऊन तक्रार द्यावी. त्यासाठी त्यांना लागणारे सर्व प्रकारचे संरक्षण देण्यात येईल. असे पोलिस निरीक्षक दयानंद गावडे यांनी सांगितले.

Web Title: threatens to kill a trader; asha gavali radar