जुन्या कात्रज घाटातून तीन आरोपी फरार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 एप्रिल 2017

पुणे - लघुशंकेच्या बहाण्याने गाडीतून खाली उतरल्यानंतर तीन आरोपींनी पोलिसांना धक्‍का मारून जुन्या कात्रज घाटातून धूम ठोकल्याची घटना सोमवारी रात्री घडली. तिघे आरोपी जबरी चोरीच्या गुन्ह्यातील सराईत गुन्हेगार असून, त्यांच्याविरुद्ध पुणे शहर आणि सातारा जिल्ह्यातील पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.

या प्रकरणी शिवाजीनगर मुख्यालयातील पोलिस कर्मचारी संजय चंदनशिवे यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काल्या ऊर्फ राजू महादेव पात्रे (रा. विद्यानगर, चिंचवड), संतोष मच्छिंद्र जगताप (रा. मोरवाडी, तुपेनगर, पिंपरी) आणि लुभ्या ऊर्फ संतोष चिंतामण चांदीलकर (रा. लव्हळे, ता. मुळशी) अशी आरोपींची नावे आहेत. 

शिवाजीनगर मुख्यालयातील एक पोलिस हवालदार आणि तीन कर्मचाऱ्यांनी आरोपींना येरवडा कारागृहातून खंडाळा (जि. सातारा) येथील न्यायालयात नेले. त्यांना दुपारी अडीच वाजता न्यायालयात हजर करण्यात आले. तेथून त्यांना पुन्हा येरवडा कारागृहात नेण्यासाठी सर्व जण पोलिस व्हॅनमधून जुन्या कात्रज घाटमार्गे येत होते. आरोपींनी घाटात भिलारेवाडी येथील चेकपोस्टजवळ वळणावर लघुशंकेसाठी जाण्याची विनंती केली. पोलिसांनी तिघांना गाडीतून खाली उतरविले. त्या वेळी पोलिसांना धक्‍का मारून अंधाराचा फायदा घेत तिघेही घाटातील जंगलात पसार झाले.

आरोपींना बेड्याच नव्हत्या...
मुख्यालयातील पोलिसांनी आरोपींना बेड्याच घातल्या नसल्याची बाब समोर आली आहे. आरोपींनी सोमवारी (ता.१०) सायंकाळी साडेसात वाजता पलायन केले; परंतु त्यांनी हा प्रकार भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात रात्री साडेअकरा वाजता कळविला. त्यानंतर भारती विद्यापीठ पोलिसांनी आरोपींना शोधण्यासाठी रात्रभर परिसर पिंजून काढला. मात्र, आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले.

Web Title: Three accused absconding