चंद्रकांत पाटील यांच्या नावाने खंडणी मागणाऱ्या तिघांना अटक, अजून एकजण फरार

Chandrakant_Patil
Chandrakant_Patil

पुणे : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नावाचा वापर करून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विविध क्षेत्रातील लोकांकडून देणगीच्या नावाखाली खंडणी उकळणाऱ्या तिघांना कोथरुड पोलिसांनी अटक केली आहे. संशयित आरोपीविरुद्ध पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथील चार पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.

सौरभ अष्टुल (वय २७), किरण शिंदे (वय ३८), किरण कांबळे (वय ३०, तिघेही रा.लोहिया नगर, गंज पेठ) अशी अटक केलेल्या संशयित आरोपीची नावे आहेत. तर या प्रकरणातील चौथा संशयित आरोपी विशाल शेंडगे (वय ३०, रा. गंज पेठ) हा फरारी आहे. या प्रकरणी निगडी, कोथरुड, डेक्कन, अलंकार पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. याप्रकरणी कोथरुड पोलिस ठाण्यात आमदार चंद्रकांत पाटील यांनी फिर्याद दिली होती.

पोलिस उपनिरीक्षक संतोष पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, आमदार पाटील यांच्या कार्यालयातून बोलत असल्याचे सांगून पक्षाच्यावतीने कोरोनाच्या कालावधीत गोर-गरिबांना मदत केली केली जात आहे. हे कार्य पुढे घेऊन जाण्यासाठी देणगीची गरज आहे, असे सांगून आरोपी डॉक्टर, बांधकाम व्यावसायिक, गणेशोत्सव मंडलाचे पदाधिकारी यांच्यासह विविध क्षेत्रातील प्रतिष्टित लोकांना फोन करत होते. आमदार पाटील यांच्यासारख्या बड्या नेत्याचे नाव घेतल्याने नागरिकही पैसे देत होते. मात्र एका प्रकरणामध्ये त्यांनी खंडणी मागत दमदाटी केली. त्यामुळे शंका आल्याने संबंधीत व्यक्तीने थेट पाटील यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला.

दरम्यान, या प्रकरणात निगडी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली होती. तर एकाला चौकशीसाठी बोलावले होते. त्याचवेळी याच प्रकरणामध्ये कोथरूड पोलिस निगडी पोलिसात दाखल झाले. त्यावेळी त्यांनी दोघाना अटक केली. तर या प्रकरणातील आरोपी सुरेश कांबळे हा गंज पेठेत राहात असल्याची खबर पोलिस कर्मचारी विजय कांबळे यांना मिळाली. त्यानुसार त्यालाही पोलिसांना अटक केली.

आमदार-खासदारांच्या नावे २०१४ पासून खंडणी उकळण्याचा प्रकार सुरू

विशाल शेंडगे आणि सुरेश कांबळे या दोघांनी २०१४ पासून अनेक नागरिकांना समाजातील नामांकित व्यक्तीची नावे घेऊन लोकांकडून पैसे उकळले आहेत. त्यांना पैसे मिळू लागल्यानंतर त्यांनी थेट आमदार-खासदारांच्या नावाचा वापर करण्यास सुरुवात केली. 

बेरोजगारांनी गंडविले रिक्षाचालक, कंत्राटी कामगार आणि प्रतिष्ठित व्यक्ती!

किरण शिंदे हा रिक्षाचालक आहे. तर सौरभ अष्टलु आणि सुरेश कांबळे हे दोघेजण महापालिकेत कंत्राटी पद्धतीने काम करत होते. तर विशाल शेंडगे हा बेरोजगार होता. या चौघांनी एकत्र येऊन लोकांची फसवणूक करण्याचे काम सुरू केले होते.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com