दौंड: युवकाचा निर्घृण खून केल्याप्रकरणी तिघांना अटक

प्रफुल्ल भंडारी 
रविवार, 26 ऑगस्ट 2018

डीएनए चाचणीची प्रक्रिया सुरू 
​मृत भीमाशंकरचे शीर मिळाले नसून दौंड पोलिसांनी डीएनए (डीऑक्सिरायबो न्यूक्लिक अॅसिड) चाचणीची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यासाठी भीमाशंकर याच्यासह त्याच्या आई व वडिलांचे रक्ताचे नमुने घेण्यासह अन्य पडताळणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. भीमाशंकर अविवाहित होता. 

दौंड (पुणे) : नानवीज (ता. दौंड) येथे भीमा नदी पात्रात शिर नसलेल्या अवस्थेत सापडलेल्या भीमाशंकर कलाप्पा आतनुरे (वय २१) या युवकाच्या खुनाचा तपास दौंड पोलिसांनी २४ तासात लावला असून या प्रकरणी लोणी काळभोर येथून तिघांना अटक करण्यात आली आहे. आरोपीपैकी एकाच्या नातेवाईक युवतीच्या छेडछाडीच्या प्रकारातून अत्यंत निर्घृणपणे हा खून करण्यात आल्याचे तपासात पुढे आले आहे.

दौंड पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुनील महाडिक यांनी शनिवारी (ता. २५) या बाबत माहिती दिली. खून प्रकरणी केशव सोपान काळभोर (वय ३८ ) ,हरिदास नामदेव शेंडगे ( वय ३४, दोघे रा. तरवडी मळा, लोणी काळभोर) व प्रशांत वालचंद जगताप (वय २५ , रा. अंबरनाथ आळी, लोणीकाळभोर) या तिघांना अटक करण्यात आली आहे. 

मृत भीमाशंकर आतनुरे (रा. तरवडी मळा, लोणी काळभोर, मूळ सोलापूर जिल्हा) हा कुटुंबीयांसह केशव काळभोर याच्याकडे मजुरी करीत होता. केशव काळभोर याच्या एका नातेवाईक युवतीच्या छेडछाडीच्या प्रकारातून केशव काळभोर याचा भीमाशंकर याच्यावर राग होता. भीमाशंकरला समज देऊनही तो एेकत नसल्याने त्याचा काटा काढण्यासाठी केशव काळभोर याने त्याला १८ आॅगस्ट रोजी लोणी काळभोर जवळील रामदरा डोंगरात बोलावून घेतले. तेथे तिघांनी भीमाशंकर याचा धारदार शस्त्राने शिर छाटून खून केला. त्यानंतर एका कार मध्ये त्याचा मृतदेह टाकून एका कालव्यात त्याचे शीर फेकून दिले तर धड दहिटणे (ता. दौंड) गावाजवळ १९ आॅगस्ट रोजी नदी पात्रात टाकून दिले होते, अशी माहिती श्री. महाडिक यांनी दिली.

दरम्यान नानवीज येथे २३ आॅगस्ट रोजी नदी पात्रात हा शिर नसलेला व कुजलेल्या अवस्थेत हा मृतदेह वाहत आला होता. मृताच्या अंगावर फक्त मातट रंगाची अंडरवेअर आणि डाव्या हाताच्या अंगठ्याचे वाढलेले नख या दोनच खूणा होत्या. दौंड पोलिसांनी मृताचे वर्णन व फोटो सोशल मिडीयावर पाठविण्यासह मुळा - मुठा आणि भीमा नदीकाठच्या गावातील बेपत्ता लोकांची नोंद तपासली. दरम्यान लोणी काळभोर येथून भीमाशंकर आतनुरे बेपत्ता असल्याची तक्रार त्याच्या आईने १८ ऑगस्ट रोजी दिली होती. या माहितीवरून लोणी काळभोर पोलिसांच्या सहकार्याने बेपत्ता युवकाचे वर्णन व नानवीज येथे आढळलेल्या मयताचे वर्णन जुळल्याने पोलिसांच्या तपासाला गती व योग्य दिशा मिळाली. भीमाशंकर याच्या आईने धड पाहून सदर व्यक्ती भीमाशंकर असल्याची खात्री दिली. 

मृताची ओळख पटल्यावर दौंड पोलिसांनी पुढील तपास करीत केशव काळभोर, हरिदास शेंडगे व प्रशांत जगताप यांना शुक्रवारी (ता. २४) ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर या खुनाचा उलगडा झाला. अपर पोलिस अधीक्षक संदिप पखाले, उप अधीक्षक गणेश मोरे, निरीक्षक सुनील महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक धनंजय कापरे, फौजदार गजानन जाधव यांच्यासह हवालदार कल्याण शिंगाडे, सचिन बोराडे, असिफ शेख, बाळसाहेब चोरमले, धनंजय गाढवे, संतोष सुपेकर, अमोल गवळी, सुनील सस्ते, लोणी काळभोर पोलीस स्थानकाचे सागर कडू, रॉकी देवकाते, आदींनी या खुनाचा छडा लावण्यासाठी सामुहिक प्रयत्न केले. खून प्रकरणातील तिघा आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना ३० तारखेपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले.

डीएनए चाचणीची प्रक्रिया सुरू 
मृत भीमाशंकरचे शीर मिळाले नसून दौंड पोलिसांनी डीएनए (डीऑक्सिरायबो न्यूक्लिक अॅसिड) चाचणीची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यासाठी भीमाशंकर याच्यासह त्याच्या आई व वडिलांचे रक्ताचे नमुने घेण्यासह अन्य पडताळणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. भीमाशंकर अविवाहित होता. 

Web Title: three arrested for murder in Daund Pune