आतषबाजीवेळी तिघे भाजले

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 एप्रिल 2018

चाकण - कुरुळी (ता. खेड) येथील भैरवनाथ महाराजांच्या यात्रेनिमित्ताने केलेल्या शोभेच्या आतषबाजीवेळी दारूगोळा ठेवलेल्या पोत्याने पेट घेतल्याने उडालेल्या ठिणग्यांनी तीन जण भाजले. त्यांतील दोघे गंभीर जखमी आहेत.

चाकण - कुरुळी (ता. खेड) येथील भैरवनाथ महाराजांच्या यात्रेनिमित्ताने केलेल्या शोभेच्या आतषबाजीवेळी दारूगोळा ठेवलेल्या पोत्याने पेट घेतल्याने उडालेल्या ठिणग्यांनी तीन जण भाजले. त्यांतील दोघे गंभीर जखमी आहेत.

कुरुळी येथे यात्रेनिमित्त शोभेच्या दारूगोळ्यांची आतषबाजी करण्याची गेल्या ९० वर्षांची परंपरा आहे. रविवारी (ता. ८) या आतषबाजीवेळी दारूगोळ्याचे मडके फुटून त्याच्या ठिणग्या दारूगोळा साठविलेल्या पोत्यावर पडल्या, त्यामुळे दारूगोळ्याने पेट घेतला. त्यातून उडालेल्या दारूगोळ्याच्या ठिणग्यांनी तीन जण भाजले. यात दोन जण गंभीर जखमी आहेत. रितेश विलास डोंगरे (वय १९, रा. कुरुळी), अजय विलास माघाडे (वय ३६, रा. नगर) हे दोघे साठ ते पासष्ट टक्के भाजले आहेत. हे दोघे गंभीर असून, तिसरा सय्यद शफी अब्दुल रहेमान (वय ५५, रा. नगर) हा पंधरा ते वीस टक्के भाजला आहे. सय्यद व अजय या दोघांवर चाकण येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत; तर रितेश डोंगरे याच्यावर पुणे येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

कुरुळी येथे दरवर्षी यात्रेला रात्री दहा ते अकरा या वेळेत शोभेच्या दारूगोळ्यांची आतषबाजी करण्यात येते. या वर्षी नगर येथील ‘जमीर फायर वर्क्‍स’चे आठ ते दहा कामगार दारूगोळे उडविण्याचे काम करत होते. विविध रंगांचे उडणारे दारूगोळे पाहण्यासाठी मंदिर परिसरात ग्रामस्थ, पाहुणे व इतर नागरिकांची मोठी गर्दी होती. या वेळी दारूगोळे उडविताना एका कामगाराच्या हातातील दारूगोळ्याचे मडके फुटले व त्याच्या ठिणग्या दारूगोळा साठविलेल्या पोत्यावर पडल्या. त्यामुळे त्यातील दारूगोळे उडायला लागले. या दारूगोळ्याच्या ठिणग्या उडून जवळ असलेले दारूगोळा उडविणारे कामगार सय्यद व अजय यांच्या कपड्यांनी पेट घेतला. त्यामुळे ते भाजले. तसेच, कुरुळी गावातील तरुण रितेश हा कपड्याने पेट घेतल्याने भाजला. तिघे भाजल्यानंतर परिसरात पळापळ सुरू झाली. त्यानंतर जखमींना रुग्णालयात नेण्यात आले. 

याबाबत पोलिसांत माहिती व तक्रार देण्यात आली नाही, अशी माहिती पोलिस निरीक्षक मनोज यादव यांनी दिली.

Web Title: three burn in fire shonw