#PuneRains : दौंड तालुक्यात पाण्यात वाहून गेल्याने तिघांचा मृत्यू 

प्रफुल्ल भंडारी
Thursday, 15 October 2020

दौंड तालुक्यातील राजेगाव - खानवटे रस्त्यावरील ओढयाच्या पाण्यात वाहून गेल्याने एका दांपत्यासह एकूण तीन जणांचा बळी गेला आहे. 

दौंड (पुणे) : दौंड तालुक्यातील राजेगाव-खानवटे रस्त्यावरील ओढयाच्या पाण्यात वाहून गेल्याने एका दांपत्यासह एकूण तीन जणांचा बळी गेला आहे. स्थानिक ग्रामस्थांनी तीन जणांचे मृतदेह बाहेर काढले असून त्यांच्यासमवेत असलेल्या एका व्यक्तीचा शोध सुरू आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शहाजी गंगाधर लोखंडे (वय ५२), अप्पासाहेब हरिश्चंद्र धायतोंडे (वय ५५) व कलावती अप्पासाहेब धायतोंडे (वय ४८, सर्व रा. खानवटे, ता. दौंड) अशी मृतांची नावे आहेत. तर सुभाष नारायण लोखंडे (वय ४८ रा. खानवटे) हे बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू आहे. दौंड तालुक्यास सलग सहा दिवस विजेच्या कडकडाटांसह मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे.

Pune Rain:पुण्यात आज काय घडतंय? परीक्षा पुढे ढकलल्या, महापालिकेची हेल्पलाईन सुरू

बुधवारी (ता. १४) रात्री अप्पासाहेब धायतोंडे व सुभाष लोंढे यांच्या दोन दुचाकींवरून चार जण राजेगाव वरून आपल्या गावी खानवटे कडे निघाले होते. सततच्या पावसामुळे रस्त्यात तुकाई मंदिराजवळील ओढ्याच्या पूर आला व पाण्याची पातळी वाढली होती. रात्री ओढ्याच्या वाढलेल्या पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांनी दुचाकी वाहने त्या प्रवाहात घातली परंतु चौघे जण दुचाकींसह पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले.

Heavy Rain: सहा तासांचा थरार, पुरात वाहून जाणाऱ्या दोघांना वाचवले!

आज (ता. १५) सकाळी स्थानिक ग्रामस्थांनी ओढ्याच्या प्रवाहात शोध घेतला असता रस्त्यापासून ४० ते १०० फुट अंतरावर पाण्यात तिघांचे मृतदेह आढळून आले. तिन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी दौंड शहरातील उप जिल्हा रूग्णालयात रवाना करण्यात आले आहे. बेपत्ता असलेले सुभाष लोंढे यांचा शोध सुरू आहे. 

(संपादन : सागर दिलीपराव शेलार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Three civilians died after being swept away in the water