अवयवदानातून फुलल्या जीवनज्योती 

अवयवदानातून फुलल्या जीवनज्योती 

पुणे -  सलग तीन दिवस अवयवदानाच्या घटनांची नोंद पुणे "झोनल ट्रान्सप्लॅंट को-ऑर्डिनेशन कमिटी'च्या (झेडटीसीसी) वैद्यकीय  इतिहासात प्रथमच झाली. त्यातून मेंदूचे कार्य थांबलेल्या (ब्रेन डेड) तीन रुग्णांच्या अवयवदानातून दहा रुग्णांचे प्राण वाचविण्यात वैद्यकीय तज्ज्ञांना यश आले आहे.

पुण्यातील डॉक्‍टर, वैद्यकीय समाजसेवक यांच्या अथक प्रयत्नांमुळे केवळ पुण्यातीलच नाही; तर नाशिक, मुंबई आणि चेन्नईतील रुग्णांनाही नवे जीवन मिळाल्याची भावना पुण्यातील वैद्यकीय क्षेत्रात व्यक्त होत आहे. 

पुणे "झेडटीसीसी'मध्ये समावेश होणाऱ्या सोलापूरमध्ये पहिले अवयवदान झाले. तेथून मेंदूचे कार्य थांबलेल्या रुग्णाचे यकृत आणि दोन्ही मूत्रपिंड दान केली. सोलापूर येथून यकृत पुण्यातील ज्युपिटर रुग्णालयात आणण्यात आले. एक मूत्रपिंड नाशिक येथील अपोलो रुग्णालयातील रुग्णाला प्रत्यारोपित करण्यात आले. दुसरे सोलापूर येथील यशोधरा रुग्णालयातील रुग्णाला बसविण्यात आले. 

जहॉंगीर हॉस्पिटलमध्ये दुसरे अवयव दान झाले. या रुग्णाने दान केलेले यकृत नाशिक येथील अपोलो रुग्णालयातील रुग्णाला मिळाले. एक मूत्रपिंड जहॉंगीर रुग्णालय आणि दुसरे मूत्रपिंड दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील रुग्णावर प्रत्यारोपित करण्यात वैद्यकीय तज्ज्ञांना यश आले. 

सलग तिसरे अवयव दान "केईएम' रुग्णालयात करण्यात आले. तेथील अवयवदात्याने हृदय, फुफ्फुस, यकृत आणि मूत्रपिंड दान केले. दान केलेले हृदय रुबी हॉल क्‍लिनिक येथील रुग्णाला रविवारी सकाळी प्रत्यारोपित केले. तर, फुफ्फुस चेन्नई येथील ग्लोबल रुग्णालयात दुपारी विमानातून पाठविण्यात आले. दान केलेले यकृत केईएम आणि एक मूत्रपिंड दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील रुग्णाला मिळाले. 

औरंगाबादला पुण्याची मदत 
औरंगाबाद येथील रुग्णालयातील "ब्रेन डेड' रुग्णाच्या नातेवाइकांनी अवयव दान करण्याची इच्छा व्यक्त केली. पण, औरंगाबादमध्ये दान केलेले अवयव घेण्यासाठी कोणताही रुग्ण नव्हता. तसेच, तेथे हे अवयव रुग्णाच्या शरीरापासून वेगळे करण्यासाठी शल्यचिकित्सकही नव्हते. त्यामुळे पुण्यातील वैद्यकीय तज्ज्ञांनी क्षणाचाही विलंब न करता औरंगाबाद गाठले. तेथील रुग्णाने दान केलेले यकृत आणि दोन मूत्रपिंड पुण्याला आणले. त्यातील एक मूत्रपिंड मुंबईतील रुग्णाला प्रत्यारोपित करण्यासाठी देण्यात आले. 

अवयवदानाबाबत पुण्यात जागृती होत असल्याचे या घटनांतून स्पष्ट होते. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने केलेल्या जनजागृतीमुळे अवयवदानात पुणे हे देशात अग्रेसर होत आहे. 
आरती गोखले, समन्वयक, झेडटीसीसी, पुणे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com