खून करून मृतदेह घेऊन निघाले दुचाकीवरून

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 सप्टेंबर 2019

येरवडा येथील सादलबाबा दर्ग्याजवळ एका चोवीस वर्षीय तरुणाचा त्याच्याच तीन सहकाऱ्यांनी गुरुवारी (ता. 19) रात्री खून केला. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मोटारसायकलवरून निघालेले तिघांना पोलिसांनी चार किलोमीटरचा पाठलाग करून मृतदेहासह ताब्यात घेतले आहे.

लोणी काळभोर (पुणे) : येरवडा येथील सादलबाबा दर्ग्याजवळ एका चोवीस वर्षीय तरुणाचा त्याच्याच तीन सहकाऱ्यांनी गुरुवारी (ता. 19) रात्री खून केला. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मोटारसायकलवरून निघालेले तिघांना पोलिसांनी चार किलोमीटरचा पाठलाग करून मृतदेहासह ताब्यात घेतले आहे.

भारत राजू बढे (वय 24, रा. कासारवाडी पुणे) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी अशोक संतोष आडवाणी (वय 22 रा. पिंपरी), अक्षय दिलीप पवार (वय 19) व विजय संतोष पवार (वय 19, रा. वरवंड, ता. दौंड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. भारत बढे याच्यासह अशोक आडवाणी, अक्षय पवार व विजय पवार हे चौघे भुरटे चोर आहेत. काही दिवसांपासून भरत बढे दारू पिल्यानंतर तिघांना शिवीगाळ व दमदाटी करत होता. गुरुवारी रात्री सादल बाबा दर्गाजवळ चौघेही दारू पीत असताना, बढे याने दारूच्या नशेत दादागिरी करण्याचा प्रयत्न केला. यातून किरकोळ वादावादीला सुरवात झाली. त्यातूनच अशोक आडवाणी, अक्षय पवार व विजय पवार या तिघांनी तिष्ण हत्याऱ्याने व दगडाने ठेचून त्याचा खून केला. खून केल्यानंतर भेदरलेल्या तिघांनीही भारताच्या मृतदेहाला प्लास्टिक गोणीने झाकण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्याच्या उद्देशाने मृतदेह मोटारसायकलवर घेऊन जागा शोधू लागले. मृतदेह घेऊन तिघेही येरवड्याहून नगर मार्गावरील वाघोली ते केसनंद-कोलवडी मार्गे थेऊरहून पुणे-सोलापूर महामार्गाकडे निघाले होते. त्यावेळी त्यांना अटक करण्यात आली.

पोलिस संदीप देवकर यांची सतर्कता
थेऊर गावातील चौकात रात्रीची गस्त घालताना थांबलेल्या लोणी काळभोर वाहतूक शाखेचे पोलिस कर्मचारी संदीप देवकर यांना तिघे मोटारसायकलवरून जाताना दिसले. त्याला संशय आला. संदीप देवकर यांनी सोबत असलेल्या दत्ता वीर व विजय शिंदे या होमगार्ड सहकाऱ्यांच्या मदतीने मोटारसायकलचा पाठलाग सुरू केला. पोलिस पाठलाग करत असल्याचे लक्षात येताच, तिन्ही आरोपींनी मोटारसायकल थेऊरफाट्यावरील लक्ष्मी मंगल कार्यालयात घुसवली व तिघेही अंधारात लपले. मात्र, संदीप देवकर यांनी जिवाची पर्वा न करता मंगल कार्यालयात घुसून तिघांना ताब्यात घेतले. त्यानंतर पाच मिनिटात पोलिसांनी घटनास्थळी जाऊन वरील तिघांना ताब्यात घेतले व मृतदेहही ताब्यात घेतला.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Three Friends Arrested In Murder Case