बैलगाडी-टँकर अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

बैलगाडी-टँकर अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

केडगाव (जि. पुणे) : पुणे-सोलापूर महामार्गावर ऊस तोडणी मजुरांच्या बैलगाडीला टँकरने धडक देऊन झालेल्या अपघातात पती, पत्नी व त्यांची सात महिन्यांची मुलगी ठार झाली. हा अपघात आज पहाटे साडेपाच वाजता झाला.

गोरख येडू चव्हाण (वय 25), जयश्री गोरख चव्हाण ( वय 22 ), पप्पी गोरख चव्हाण ( वय 7 महिने ) यांचा मृतांमध्ये समावेश आहे. येडू गणपत चव्हाण ( वय 58 सर्व रा. भीमा पाटस कारखाना, ता.दौंड. मूळ गाव तळबंदतांडा, ता. बडगाव, जि.जळगाव ) हे या अपघातात गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर दौंड येथील खासगी रूग्णालयात उपचार सुरु आहेत.

पोलिसांच्या माहितीनुसार, येडू चव्हाण हे आपला मुलगा, सून व नातीसह कारखान्यावर ऊस तोडणीसाठी आले आहेत. शनिवारी पहाटे पुणे सोलापूर महामार्गावरून ते चौघेही एकाच बैलगाडीतून वरवंड हद्दीत उसाच्या शेतावर जात होते. यावेळी दहा बैलगाडया महामार्गाने जात होत्या. त्यात सर्वांत पहिली बैलगाडी चव्हाण यांची होती. वरवंड-चौफुला शिवेजवळ चव्हाण यांची बैलगाडी पुणे लेन सोडून सोलापूर लेनमध्ये जात असताना पुणेकडून सोलापूर बाजूकडे जाणा-या टँकरने ( एम.एच.08 एच. 0512 ) चव्हाण यांच्या बैलगाडीला जोराची धडक दिली. त्यात जयश्री व पप्पी जागीच ठार झाले तर गोरख हे रूग्णालयात नेत असताना ठार झाले. येडू चव्हाण यांना दौंड येथील खासगी रूग्णालयात दाखल केले. अपघातग्रस्तांच्या डोक्याला, पोटाला, हात पायांना मार लागला आहे. अपघातानंतर चालक संजयकुमार मंडल ( रा.खेड, जि. रत्नागिरी ) याला ऊस तोडणी मजूरांना बेदम मारहाण केली आहे.

स्थानिक ग्रामस्थांनी 100 क्रमांकावर फोन करून अपघाताची माहिती दिली. यवत पोलिस व महामार्ग वाहतूक पोलिसांना उशीरा माहिती मिळाल्याने त्यांना घटनास्थळी पोहचण्यास विलंब झाला. मात्र या विलंबाबाबत ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत ऊस तोडणी मुकादम संजय गबरू पवार यांनी फिर्याद दिली. घटनास्थळाला पोलिस निरीक्षक सूरज बंडगर यांनी भेट दिली आहे. मृतदेह अंत्यसंस्कारासाठी मूळगावी नेण्यात आले आहेत. भीमा पाटस कारखान्याचे अध्यक्ष व आमदार राहुल कुल यांनी मृतांच्या नातेवाईकांची भेट घेऊन त्यांना धीर दिला. जखमी येडू चव्हाण यांचा दवाखान्याचा खर्च भीमा पाटस कारखान्याच्यावतीने केला जाणार आहे. दरम्यान या घटनेमुळे कारखाना परिसरावर शोककळा पसरली आहे.    

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com