इंदापूरमध्ये तीन किलोमीटर एकता दौड

डॉ. संदेश शहा
गुरुवार, 30 ऑगस्ट 2018

इंदापूर - राष्ट्रीय एकात्मता, सर्वधर्मसमभाव तसेच सामाजिक एकता संवर्धित करण्यासाठी येथील हर्षवर्धन पाटील मित्रमंडळाच्या वतीने आयोजित तीन 

इंदापूर - राष्ट्रीय एकात्मता, सर्वधर्मसमभाव तसेच सामाजिक एकता संवर्धित करण्यासाठी येथील हर्षवर्धन पाटील मित्रमंडळाच्या वतीने आयोजित तीन 
किलोमीटर एकता दौड मध्ये हजारो युवक, युवती व नागरिक सहभागी झाले. दौडचा शुभारंभ आंतरराष्ट्रीय धावपटू ललिता बाबर, आयर्नमॅन  सतिश ननवरे व दशरथ जाधव, माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, पीपल्स रिपब्लीकन पक्ष पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष संजय सोनवणे, भाजपा शहराध्यक्ष माऊली वाघमोडे, एस. बी. पाटील प्रतिष्ठानच्या विश्वस्त अंकिता पाटील, इंदापूर बाजार समितीचे माजी सभापती मयुरसिंह पाटील, इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकूंद शहा, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अॅड. कृष्णाजी यादव, प्राचार्य डॉ. संजय चाकणे यांच्या हस्ते इंदापूर महाविद्यालय कस्तुरबा प्रवेशव्दाराजवळ हिरवा झेंडा दाखवून तसेच फुगे उडवून झाला. 

इंदापूर वकिल संघटना, रोटरी क्लब, लायन्स व लायनेस क्लब, डॉक्टर संघटना, भिगवण महाविद्यालय व सायकल क्लबचे प्रतिनिधी, श्री. नारायणदास रामदास हायस्कूल, इंदापूर महाविद्यालय, एस. बी पाटील विकास प्रतिष्ठान, शिवाजी एज्युकेशन सोसायटीचे विद्यार्थी या दौडमध्ये सहभागी झाले होते. ही दौड तब्बल साडेतीन तास चालली. 

यावेळी ललिता बाबर म्हणाल्या, एकता दौडचा उपक्रम राज्याबरोबरच देशासाठी आदर्श व स्तुत्य असून याचे श्रेय हर्षवर्धन पाटील यांना जाते. दौडचे व्यासपीठ ग्रामिण युवक युवतींना प्रेरणादायी असून त्यातून सामाजिक बांधीलकी वाढते. त्यामुळे युवक, युवतींना आपणास स्वत:स सिध्द करण्यासाठी जिद्द, मेहनत व आत्मविश्वास यामध्ये योग्य समन्वय ठेवून गावाचा नावलौकीक वाढवावा.

माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील म्हणाले, मराठा, धनगर, मुस्लीम, लिंगायत, महादेव कोळी समाजास आरक्षण मिळालेच पाहिजे ही आमची भुमिका आहे. मात्र आरक्षणाच्या आंदोलनामुळे राज्यात अराजकतेची स्थिती निर्माण झाली आहे. मात्र जातीपातीगटतट न पहाता आम्ही सर्वजण भारतीय आहोत याची जाणीव सर्वांना करून देण्यासाठी या भव्य दौडचे आयोजन करण्यात आले. महाविद्यालयातून अनेक राष्ट्रीय खेळाडू तयार झाले असून महाविद्यालयात दि. १५ सप्टेंबर रोजी आंतरविद्यापीठ कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. इंदापूरचा हा पॅटर्न संपुर्ण राज्यास आदर्श आहे. अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत ललिता बाबर यांनी आंतरराष्ट्रीय धावपटू म्हणून मिळविलेल्या यशाचा आदर्श युवापिढीने घेवून इतिहास निर्माण करा असे आवाहन त्यांनी केले.

आयर्नमॅन दशरथ जाधव म्हणाले, निरोगी शरीर ही खरी धनसंपदा असून या संपदेचे संवर्धन करण्यासाठी प्रत्येकाने व्यसनमुक्त असणे तसेच 
दैनंदिन व्यायाम करणे ही काळाची गरज आहे. 

दौडमध्ये लालासाहेब पवार, भरत शहा, अंकिता शहा, उदयसिंह पाटील, शालन भोंग, ऋतुजा पाटील, बाळासाहेब मोरे, सुभाष काळे, प्रशांत देशमुख, प्राचार्य. प्रा. भास्कर गटकुळ, महेंद्र रेडके, गोरख शिंदे, बापू जामदार, शेखर पाटील, रणजित भोंगळे, प्रशांत शेटे, संदिप पाटील, श्रीमंत ढोले, हर्षल पाटील, संग्रामसिंह देशमुख सहभागी झाले होते. 

सुत्रसंचलन प्रा. भरत भुजबळ, प्रा. बाळासाहेब पराडे व प्रा. रोहीदास भांगे यांनी केले. 

८० वर्षाचे जेष्ठ नेते शहाजी भुजबळ यांनी बायपास सर्जरी झाल्यानंतर सुध्दा ही दौड पुर्ण केली. मानसिक व शारिरीक तंदुरूस्तीसाठी तसेच सामाजिक एकतेसाठी त्यांचा तसेच या ऐतिहासिक कामाबद्दल हर्षवर्धन पाटील यांचा आदर्श सर्वांनी घ्यावा असे आवाहन डॉ. लक्ष्मण आसबे यांनी करताच टाळ्यांच्या कडकडाटात त्याचे स्वागत झाले. 

दौड दरम्यान हर्षवर्धन पाटील यांनी शहरात ठिकठिकाणी नागरिकांना हात उंचावून अभिवादन केले. आगामी विधानसभा निवडणूकीत काँग्रेसचे हात हे चिन्ह लक्षात ठेवावे हा त्यांचा हेतू असल्याचे जाणवत होते. त्यामुळे हर्षवर्धन पाटलांच्या युक्तीप्रदर्शनातून शक्तप्रदर्शनाचे राजकिय वर्तुळात कौतुक झाले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Three km Unity run in Indapur