आंबेगाव तालुक्यात वाढला कोरोनाचा धोका, एकाच दिवशी सापडले एवढे रुग्ण 

corona
corona

महाळुंगे पडवळ (पुणे) : आंबेगाव तालुक्यातील महाळुंगे पडवळ येथे दोन, तर चास येथे एक, अशा एकूण तीन जणांचा कोरोना अहवाल सोमवारी (ता. 6) पॉझिटिव्ह आला आहे.  त्यामुळे तालुक्यातील रुग्णांचा आकडा 65 वर पोहोचला असून, त्यातील 48 जण कोरोनातून मुक्त झाले आहेत, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश ढेकळे व गटविकास अधिकारी जालिंदर पठारे यांनी दिली.

महाळुंगे पडवळ-सैदवाडी येथील 40 वर्षीय व्यक्ती सहा दिवसांपूर्वी मंचर येथील एका व्यापाऱ्याकडे वस्तू खरेदीसाठी व नामांकित बँकेच्या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेला होता. त्यानंतर त्यांना थकवा व अंगदुखीचा त्रास जाणवू लागला होता. नुकताच त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यांच्या संपर्कातील 18 जणांपैकी पत्नी व आईचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यांच्यावर भीमाशंकर हॉस्पिटल येथे उपचार करण्यात येत आहेत. 

चास- तोडकरमळा येथे 33 वर्षाच्या तरुणाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तो मंचर येथे राहत आहे. मंचर व चास येथे त्याच्या संपर्कात आलेल्या नागरिकांना क्वारंटाइन करण्याची प्रक्रिया प्रशासनाने सुरू केली आहे. या पूर्वी चास गावात पॉझिटिव्ह आढळलेली महिला व लहान मूल कोरोनामुक्त झाले आहे. मात्र, पुन्हा रुग्ण आढळल्याने गावकऱ्यांची धाकधूक वाढली आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

नारोडी येथील 34 वर्षीय युवकाच्या घरातील तीन जण पॉझिटिव्ह झाले होते. त्यातील एक ग्रामपंचायत कर्मचारी असल्याने त्यांचा अनेक लोकांशी संपर्क आला होता. त्यांच्या संपर्कातील 20 जणांचे कोरोना रिपोर्ट आज निगेटिव्ह आले. त्यामुळे नारोडीकरांची चिंता दूर झाली आहे. मात्र, संपूर्ण गावाला 14 दिवस काळजी घ्यावी लागणार आहे. ग्रामपंचायतीतील ग्रामसेवक व कर्मचारी आणि सरपंच हे  क्वारंटाइन झाले आहेत.

आंबेगाव पंचायत समिती, तहसील कार्यालय घोडेगाव, महाळुंगे पडवळ, चास ग्रामपंचायत, महाळुंगे पडवळ प्राथमिक आरोग्य केंद्र, चास आरोग्य पथक, मंचर, घोडेगाव पोलिस ठाणे आदी कार्यालयांमार्फत गावागावांत कोरोना रोखण्यासाठी विविध उपाय योजना प्रशासनाने हाती घेतल्या आहेत. बाहेरगावाहून आलेल्या नागरिकांच्या पोलिस ठाणे व पोलिस पाटील यांच्यामार्फत काटेकोरपणे नोंदी घेऊन त्यांना होम क्वारंटाइन केले जात होते. परंतु, स्थानिक नागरिकांना कोरोनाची लागण होऊ लागली आहे. त्यामुळे वेळोवेळी हात धुवून मास्क व सॅनिटायझरचा वापर करण्याचे आवाहन आरोग्य कर्मचाऱ्यांनी केले आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com