दरोडेखोरांच्या हल्ल्यात दांपत्यासह मुलाचा मृत्यू

दरोडेखोरांच्या हल्ल्यात दांपत्यासह मुलाचा मृत्यू

सोमाटणे - दरोडेखोरांनी सोमवारी रात्री केलेल्या मारहाणीत आई, वडील व मुलाचा जागीच मृत्यू झाला. तर माय-लेकी गंभीर जखमी झाल्या. धामणे येथून सुमारे एक किलोमीटरवरील शेतात बांधलेल्या घरात मंगळवारी पहाटे दीड ते साडेतीनच्या सुमारास हा प्रकार घडला.

नथू विठोबा फाले (वय ६५), पत्नी छबाबाई (वय ६०) आणि मुलगा अत्रिनंदन (वय ३५) अशी मृतांची नावे आहेत. अत्रिनंदन यांची पत्नी तेजश्री (वय ३०) आणि मुलगी ईश्‍वरी (वय २) गंभीर जखमी झाल्या आहेत. अत्रिनंदन यांच्या मोठ्या मुली अंजली (वय ९) व अनुश्री (वय ७) या सुखरूप आहेत. 

अप्पर पोलिस अधीक्षक राजकुमार शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, नथू फाले यांचे शेतात घर आहे. त्यातील एका खोलीत फाले यांच्यासह छबाबाई व अत्रिनंदन; तर दुसऱ्या खोलीत तेजश्री व त्यांच्या मुली अंजली, अनुश्री व ईश्‍वरी झोपलेल्या होत्या. एका खोलीचा दरवाजा उचकटून दरोडेखोर चोरी करीत होते. त्यांच्या आवाजाने नथू फाले, छबाबाई व अत्रिनंदन जागे झाले. त्यांच्यावर दरोडेखोरांनी टिकाव, कुदळ व गजाने हल्ला केला. डोक्‍यात घाव बसल्याने तिघांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर दरोडेखोरांनी दुसऱ्या खोलीत प्रवेश करून तेजश्री व ईश्‍वरी यांच्या कानातील व गळ्यातील दागिने ओरबाडून हल्ला केला. त्यात दोघीही गंभीर जखमी झाल्या. दागिने व इतर ऐवज घेऊन दरोडेखोर पसार झाले. काही वेळाने तेजश्री शुद्धीवर आल्यानंतर त्यांनी शेजारी राहणाऱ्या रत्नाबाई गराडे यांना घडलेला प्रकार सांगितला. त्यांचा आरडाओरडा ऐकून परिसरातील शेतकरी धावून आले. त्यांनी पोलिसांशी संपर्क साधून दरोड्याबाबत माहिती दिली. पोलिस अधीक्षक सुवेझ हक, अप्पर अधीक्षक राजकुमार शिंदे, उपविभागीय अधिकारी अक्षय शिंदे, 

निरीक्षक मुगट पाटील, गुन्हे शाखेचे अधिकारी राम जाधव, सतीश होडगर, अंकुश माने घटनास्थळी दाखल झाले. श्‍वान पथकाने घरापासून अर्ध्या किलोमीटरपर्यंत माग काढला. घटनास्थळी मिळालेले ठसे प्रयोगशाळेत पाठविले आहेत. दरोडेखोरांच्या मागावर विशेष शाखेचे चार व ग्रामीण पोलिसांचे चार पथके पाठवली आहेत. 

दरम्यान, नथू फाले, त्यांच्या पत्नी छबूबाई आणि मुलगा अत्रिनंदन यांच्या पार्थिवावर धामणे येथे मंगळवारी सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले, तर तेजश्री फाले व ईश्‍वरी फाले या माय-लेकींवर सोमाटणे येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली असल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले.

धामणे गावावर शोककळा
आमदार बाळा भेगडे यांनी मंगळवारी दुपारी घटनास्थळी भेट दिली. जखमींची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. अत्रिनंदन फाले यांची नऊ एकर बागायती शेती व दुग्ध व्यवसाय होता. त्यांचे कुटुंब आध्यात्मिक व सांप्रदायिक क्षेत्रातील होते. गावातील सर्वांशी त्यांचे मैत्रीचे नाते होते. दरोडा व खुनाच्या घटनेमुळे धामणे गावावर शोककळा पसरली आहे. घटनास्थळी परिसरातील गावांतील लोकांनी गर्दी केली होती. 

ग्रामरक्षक दल स्थापणार
अशा घटना होऊ नयेत, यासाठी प्रत्येक गावात तरुणांचे ग्रामरक्षक दल स्थापन करणार असून त्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे. ग्रामपंचायतींनी गावांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, असे सुचविले आहे, असे अप्पर पोलिस अधीक्षक राजकुमार शिंदे यांनी सांगितले. 

सांप्रदायिक वारसा...
गेल्या २० वर्षांपासून नथू फाले पंढरपूरची पायी वारी करीत होते. प्रत्येक एकादशीला ते आळंदीला दर्शनासाठी जायचे. पखवाज व हार्मोनिअम वाजविण्यात ते तरबेज होते. कीर्तनातही ते साथ करायचे. भजनी मंडळात सक्रिय होते. ज्ञानेश्‍वरी, तुकाराम गाथा यांसह सांप्रदायिक ग्रंथांनी त्यांचे कपाट भरलेले होते. १४ मे रोजी वयाची पासष्टी आणि लग्नाच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमाचे त्यांनी सर्वांना निमंत्रण दिले होते, असे फाले यांच्या शेजारी रत्नाबाई गराडे यांनी सांगितले. 

पासष्टीचे स्वप्न अधुरे...
तळेगाव दाभाडे (स्टेशन) - सांप्रदायिक वारसा जोपासणारे धामणे येथील नथू विठोबा फाले, त्यांची पत्नी व मुलगा दरोडेखोरांच्या मारहाणीत मृत्युमुखी पडले. ही घटना कळताच परंदवडी येथील त्यांची मुलगी द्रौपदी गोरख भोर हंबरडा फोडतच वडिलांच्या घरी पोचली. ‘मी येत्या एकादशीला तुला आळंदीला घेऊन जाईन. १४ मे रोजी माझ्या लग्नाचा वाढदिवस व पासष्टीचा कार्यक्रम आपण मोठ्या प्रमाणात साजरा करू,’ असे फोनवर त्यांनी मुलीला कळविले होते. रडता रडता द्रौपदी नातेवाइकांना सांगत होत्या.

धामणेतील दरोड्याच्या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. मावळातील गंभीर गुन्ह्यातील गुन्हेगारांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. यासाठी विशेष मोहीम सुरू केली जाणार आहे.
- विश्‍वास नांगरे पाटील, विशेष पोलिस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com