मेट्रो मार्गासाठी तीन पर्याय

Metro
Metro

पुणे - स्वारगेट ते कात्रजदरम्यान मेट्रो मार्गाबद्दल पुणेकरांची ताणली गेलेली उत्सुकता मार्च महिन्याच्या अखेरीस निकालात निघणार आहे. याबाबतचा प्रकल्प अहवाल (डिटेल्ड प्रोजेक्‍ट रिपोर्ट- डीपीआर) पुढील महिन्यात महामेट्रोकडून महापालिकेला सादर होणार आहेत. या मेट्रो मार्गासाठी तीन पर्याय नजरेसमोर असल्याचे महामेट्रोने स्पष्ट केले आहे. 

पिंपरी चिंचवड- स्वारगेट दरम्यानच्या मेट्रो मार्गाचे काम सुरू झाले आहे. परिसरातील नागरिकांनी केलेल्या मागणीनुसार महापालिकेने स्वारगेट ते कात्रजदरम्यानचा मेट्रो मार्गाचा ‘डीपीआर’ तयार करण्यास महामेट्रोला दोन महिन्यांपूर्वी सांगितले आहे. हे काम अंतिम टप्प्यात आले आहे. त्यानुसार मार्चअखेरीस महापालिकेला तो सादर करण्यात येणार आहे.

सातारा रस्त्यावर जेधे चौक आणि चैतन्यनगर येथे उड्डाण पूल आहेत. त्यातच लक्ष्मीनारायण चित्रपटगृहाजवळील साईबाबा मंदिराजवळ, प्रेमनगर चौकात आणि भारती विद्यापीठासमोर पादचारी भुयारी मार्ग आहेत.

चैतन्यनगरजवळही महापालिकेने पादचारी उड्डाण पूल उभारला आहे. यामध्ये भरीसभर म्हणजे अहल्यादेवी होळकर चौक ते चैतन्यनगर चौकादरम्यान रस्त्याच्या दुतर्फा नियोजित रस्ता रुंदीकरणही झालेली नाही. त्यामुळे सातारा रस्त्यावरून एलिव्हेटेड मेट्रो शक्‍य नसल्याचे महामेट्रोमधील सूत्रांचे म्हणणे आहे. त्यावर उपाय म्हणून स्वारगेटपासून मेट्रो एलिव्हेटेड पद्धतीने मुकुंदनगर, मार्केट यार्ड, गंगाधामजवळून गोकुळनगर आणि कात्रज चौकामध्ये आणावी, असा पर्याय आमदार माधुरी मिसाळ यांनी सुचविला आहे. त्यात अप्पर इंदिरानगरमध्ये मेट्रोसाठी डेपो करणे शक्‍य आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. तसे शक्‍य नसल्यास बिबवेवाडीमार्गे मेट्रो सातारा रस्त्याला जोडण्याच्या पर्यायावर चर्चा सुरू आहे. या पार्श्‍वभूमीवर महापालिकेतील सभागृहनेते श्रीनाथ भिमाले यांनी सातारा रस्त्यावरूनच भुयारी पद्धतीने मेट्रो कात्रजपर्यंत नेण्यात यावी, असा पर्याय सुचविला आहे. मेट्रोच्या एक किलोमीटर भुयारी मार्गासाठी सुमारे ८०० कोटी रुपये खर्च येतो.

स्वारगेटपासून कात्रज सुमारे २० मीटर उंचीवर आहे. त्यामुळे भुयारी मेट्रो करायची झाल्यास खर्चात किमान ५० टक्के वाढ होऊ शकते. त्यातून भुयारी मेट्रोच्या एक किलोमीटरसाठी सुमारे १२०० कोटी रुपये खर्च येणार आहे. सातारा रस्त्यावरून मेट्रो साकारली गेल्यास प्रवासी संख्याही पुरेशी मिळू शकते, असे महामेट्रोला सांगण्यात आले आहे. 

स्वारगेट- कात्रजदरम्यान मेट्रो मार्गासाठी तीन पर्याय आले आहेत. त्यावर नागरिकांनीही अनेक सूचना केल्या आहेत. तिन्ही मार्गांवर मेट्रोसाठी प्रवासी किती उपलब्ध होतील, याचा अभ्यास सुरू आहे. या संपूर्ण बाबींचा विचार करून मेट्रो मार्गांचे किमान दोन पर्याय महापालिकेला सुचविण्यात येतील. त्यासाठी प्रकल्प अहवाल मार्चअखेर सादर होईल.
- ब्रिजेश दीक्षित, व्यवस्थापकीय संचालक, महामेट्रो 

मेट्रोसाठीचे पर्याय
१) सातारा रस्त्याने भुयारी मेट्रो
२) स्वारगेट-मुकुंदनगर-गंगाधाम-गोकुळनगरमार्ग कात्रज चौक (एलिव्हेटेड)
३) स्वारगेट-मुकुंदनगर-बिबवेवाडीमार्ग कात्रज (एलिव्हेटेड)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com