कात्रज-स्वारगेट मेट्रोचे तीन पर्याय 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 जुलै 2018

पुणे - स्वारगेट-कात्रज मेट्रो मार्गाचा प्रकल्प आराखडा महामेट्रोने तयार केला आहे. या मार्गावर भूमिगत, एलिव्हेटेड आणि भूमिगत-एलिव्हेटेड या तिन्ही पर्यायांद्वारे मेट्रो मार्ग उभारता येईल, असे महामेट्रोने म्हटले आहे. 

पुणे - स्वारगेट-कात्रज मेट्रो मार्गाचा प्रकल्प आराखडा महामेट्रोने तयार केला आहे. या मार्गावर भूमिगत, एलिव्हेटेड आणि भूमिगत-एलिव्हेटेड या तिन्ही पर्यायांद्वारे मेट्रो मार्ग उभारता येईल, असे महामेट्रोने म्हटले आहे. 

पिंपरी-स्वारगेट मेट्रो मार्गाचे काम सध्या सुरू आहे. त्याअंतर्गत स्वारगेट चौकात मेट्रोचे भव्य स्थानक उभारणार आहे. जमिनीखाली पाच मजली, तर जमिनीवर २० मजली इमारत उभारण्याचा मेट्रोचा प्रस्ताव आहे. त्याबाबतचे प्राथमिक कामही सुरू झाले आहे. मेट्रोच्या स्वारगेट स्थानकाला सिंहगड रस्त्यावरील मेट्रोही जोडावी, अशी मागणी तेथील रहिवाशांकडून होत आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनीही खडकवासला-स्वारगेट मेट्रोचा आग्रह धरला आहे. परंतु, त्यासाठी महापालिकेकडून पत्र आले नसल्यामुळे महामेट्रोने अद्याप त्या मार्गाचा प्रकल्प आराखडा तयार केला नाही. 

या पार्श्‍वभूमीवर आमदार माधुरी मिसाळ यांनी महामेट्रोचे संचालक रामनाथ सुब्रम्हण्यम यांची गुरुवारी भेट घेतली. त्या वेळी स्वारगेट-कात्रज मार्गाच्या पर्यायांची माहिती त्यांना देण्यात आली. 

याबाबत मिसाळ म्हणाल्या, ‘‘स्वारगेट ते कात्रजदरम्यान मेट्रो मार्ग व्हायला पाहिजे. परंतु, मार्ग निश्‍चित करताना परिसरातील दाट लोकसंख्येचा विचार करून त्यांनाही मार्गात सामावून घेणे गरजेचे आहे. याबाबत परिसरातील लोकप्रतिनिधींशी चर्चा करणे आवश्‍यक आहे. त्यानुसार मेट्रोचे कार्यकारी संचालक ब्रिजेश दीक्षित यांच्याशी शुक्रवारी चर्चा करू. त्यात महापालिकेतील पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांनाही सामावून घेऊ.’’ 

Web Title: Three options of Katraj-Swargate Metro