ट्रक पळवून नेणारे तीन जण ताब्यात 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 12 ऑगस्ट 2018

चालकाला मारहाण करून, ट्रक पळवून नेणाऱ्या तिघांना पोलिसांनी अवघ्या तीन तासांत ताब्यात घेतले. ही घटना शनिवारी पहाटे मंतरवाडी फाट्यावर घडली. 
 

पुणे- चालकाला मारहाण करून, ट्रक पळवून नेणाऱ्या तिघांना पोलिसांनी अवघ्या तीन तासांत ताब्यात घेतले. ही घटना शनिवारी पहाटे मंतरवाडी फाट्यावर घडली. 

निखिल सागर धुमाळ, दीपक भरत हिरडे पाटील व रवींद्रसिंग सरदारसिंग राजावत अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी ट्रकचालक शंकर भीमराव कसबे यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. कसबे हे त्यांच्या ताब्यातील ट्रक घेऊन पहाटे साडेचारच्या सुमारास कात्रज-सासवड रस्त्याने जात होते. त्याचवेळी अचानक ट्रकसमोर एक कार आडवी घालण्यात आली. त्यामधील तिघांनी उतरून कसबे यांना खाली उतरण्यास सांगितले. त्यानंतर त्यास लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण केली. त्याचबरोबर डोक्‍यात लाकडी फळी घालून गंभीर जखमी केले. कसबे यांच्या खिशातील दोन हजार रुपये काढून घेतल्यानंतर कारमधील दोघांनी ट्रक घेऊन सासवडच्या दिशेने निघून गेले. 

कसबे यांनी तत्काळ हडपसर पोलिस ठाण्यास हा प्रकार सांगितला. त्यानंतर गस्तीवर असलेले पोलिस निरीक्षक सुनील तांबे, सहायक पोलिस निरीक्षक चव्हाण, महिला पोलिस उपनिरीक्षक सुप्रिया गावडे यांच्या पथकाने ट्रकचा शोध घेण्यास सुरवात केली. प्रारंभी दोघांकडून ट्रक जप्त करण्यात आला. त्यानंतर राजावत यास कारसह ताब्यात घेण्यात आले. ट्रक, कार, दोन हजारांची रोकड, मोबाईल असा 40 लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. 

Web Title: Three people areested in truck theft crime