तरुणाने दिले तिघांना नवजीवन

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 सप्टेंबर 2019

विश्रांतवाडी येथे झालेल्या अपघातात ब्रेनडेड झालेल्या 23 वर्षांच्या विद्यार्थ्याच्या हृदय, दोन मूत्रपिंड, यकृत व स्वादुपिंडाच्या दानामुळे तीन गरजू रुग्णांना नवजीवन मिळाले. एकाच रुग्णालयातील तीन रुग्णांवर अवयव प्रत्यारोपणाची ही पुण्यातील पहिलीच वेळ आहे.

एकाच रुग्णालयात तिघांवर पुण्यात पहिल्यांदाच प्रत्यारोपण
पुणे - विश्रांतवाडी येथे झालेल्या अपघातात ब्रेनडेड झालेल्या 23 वर्षांच्या विद्यार्थ्याच्या हृदय, दोन मूत्रपिंड, यकृत व स्वादुपिंडाच्या दानामुळे तीन गरजू रुग्णांना नवजीवन मिळाले. एकाच रुग्णालयातील तीन रुग्णांवर अवयव प्रत्यारोपणाची ही पुण्यातील पहिलीच वेळ आहे.

विश्रांतवाडी येथील हा तरुण रिक्षा चालवून शिक्षण घेत होता. त्याचे आईवडील रोजंदारी करतात. 15 सप्टेंबरला येरवडा येथे अपघात झाल्यानंतर या तरुणाला नगर रस्त्यावरील सह्याद्री रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. मात्र, तो ब्रेनडेड झाल्याचे 17 सप्टेंबरला जाहीर करण्यात आले. त्यानंतर त्याच्या आईवडिलांनी त्याच्या अवयवदानास संमती दिली. त्यानुसार त्याचे हृदय, स्वादुपिंड, यकृत आणि दोन मूत्रपिंड, अशा पाच अवयवांचे दान करण्यात आले. या अवयवांचे सह्याद्री रुग्णालयात उपचार घेणाऱ्या तिघांवर एकावेळी यशस्वी प्रत्यारोपण करण्यात आले, अशी माहिती प्रादेशिक प्रत्यारोपण समन्वय समितीच्या समन्वयक आरती गोखले यांनी दिली.

सह्याद्री रुग्णालयातील डॉ. मनोज दुराईराज, डॉ. राजेश कौशिष व डॉ. संदीप तडस, डॉ. प्रिया पलीमकर, डॉ. सुहास सोनावणे, डॉ. सौरभ बोकील, डॉ. बिपिन विभूते, डॉ. दिनेश झिरपे, डॉ. शैलेश साबळे, डॉ. अनिरुद्ध भोसले, डॉ. शीतल महाजनी, डॉ. मनन दोशी, डॉ. सचिन पाटील, डॉ. अभिजित माने भूलतज्ञ डॉ. मनीष पाठक, डॉ. मनोज राऊत, डॉ. शंतनू शास्त्री यांच्या पथकाने हे प्रत्यारोपण यशस्वी केले. त्यासाठी वैद्यकीय सामाजिक कार्यकर्त्या शर्मिला पाध्ये, प्रत्यारोपण समन्वयक राहुल तांबे, अरुण अशोक व अमन बेले यांनी परिश्रम घेतले.

या रुग्णांना नवजीवन
तळेगाव येथील फॉरेन्सिक मेडिसीन विभागाचे प्राध्यापक असलेल्या 65 वर्षांच्या ज्येष्ठांवर हृदय प्रत्यारोपित केले. निकामी झालेल्या चेन्नईतील 55 वर्षांच्या मधुमेह झालेल्या व्यक्तीवर मूत्रपिंड व स्वादूपिंड एकाचवेळी प्रत्यारोपित करण्यात आले. तसेच नगर रस्त्यावरील सह्याद्री रुग्णालयातील 32 वर्षांच्या रुग्णावर यकृतासह मूत्रपिंडाचे प्रत्यारोपण करण्यात आले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Three Person Life Saving by Youth Motivation