अंदाज न आल्याने तिघे अडकले पुरात 

Dattatray Kadam
मंगळवार, 6 ऑगस्ट 2019

पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्यामुळे पुरात अडकलेल्या दोन ट्रकमधील तिघांना मांडवगण पोलिसांच्या तत्परतेने जीवदान मिळाले. 

मांडवगण पोलीसांच्या तत्परतेने वाचले तिघांचे प्राण 

मांडवगण फराटा (पुणे) : पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्यामुळे पुरात अडकलेल्या दोन ट्रकमधील तिघांना मांडवगण पोलिसांच्या तत्परतेने जीवदान मिळाले. 

पुणे येथील मालवाहू ट्रक निघोज (ता. पारनेर) येथून कांदा भरल्यानंतर चेन्नईला माल घेऊन चालले होते. भीमा नदीला पूर आल्याने मांडवगणच्या मुख्य रस्त्यावर पाणीच पाणी झाले आहे. या वेळी याच रस्त्याने जाणाऱ्या दोनही मालवाहू ट्रकचालकांना अंधारात पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांनी ट्रक तसेच पाण्यात घातले. अगदी काचेच्या जवळ पाणी आल्याने दोन ट्रकमधील अभिमान साळुंके, सागर साळुंके, गजानन पुंजकर या व्यक्तींनी आरडाओरडा करण्यास सुरवात केली. 

या वेळी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे रात्र पाळीवर असणारे वॉचमन सतीश शिंदे यांनी या व्यक्तींचा आवाज ऐकला व तत्काळ मांडवगण पोलिस चौकीत धाव घेतील. उपस्थित पोलिस कर्मचाऱ्यांना याबाबत कळविले. या वेळी ड्युटीवर असणारे मांडवगण फराटा पोलिस चौकीचे पोलिस हवालदार आबासाहेब जगदाळे, योगेश गुंड, होमगार्ड धर्मराज खराडे, पोलिस मित्र अक्षय काळे यांनी घटनास्थळी तत्काळ धाव घेत होडीच्या साह्याने ट्रकमध्ये अडकलेल्या तीन व्यक्तींची सुखरूप सुटका केली.

होडीचालक राजेंद्र खोमणे, संतोष खोमणे, सुनील खोमणे यांनी मोठ्या धाडसाने पुराच्या पाण्यात होडी नेऊन अडकलेल्या या तिघांचेही प्राण वाचविले. 

शेतीमालाचे नुकसान 

दोन्ही ट्रकमधील कांदे भरलेल्या गोण्या पाण्याने भिजल्या असून, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Three rescued from flood by police