अभियांत्रिकी प्रवेशाच्या यंदा तीनच फेऱ्या?

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 19 फेब्रुवारी 2017

अभियांत्रिकी प्रवेशाची एक फेरी कमी झाल्यास नियमित दोन फेऱ्या आणि तिसरी समुदेशन फेरी, अशी या प्रक्रियेची रचना असेल. या बदलामुळे विद्यार्थ्यांना चौथ्या फेरीऐवजी तिसऱ्या फेरीतच महाविद्यालयांचे पसंतीक्रम, शाखा यासह कोणतेही बदल करता येतील.
- डॉ. सुभाष महाजन, तंत्र शिक्षण संचालक

पुणे : अभियांत्रिकी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया लवकर पूर्ण करण्यासाठी या वर्षी प्रवेशाची एक फेरी कमी होणार आहे. तंत्र शिक्षण संचालनालय प्रवेशाच्या तीनच फेऱ्या करण्यासंबंधी विचार करीत आहे. पुढील आठवड्यात यासंबंधी निर्णय जाहीर होण्याची शक्‍यता आहे.

अभियांत्रिकी प्रवेशासाठी आतापर्यंत चार फेऱ्या म्हणजे तीन नियमित फेऱ्या आणि चौथी समुदेशन फेरी होत होती. परंतु या वर्षी त्यात बदल करण्याचा विचार तंत्र शिक्षण संचालनालय करीत आहेत. अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या रिक्त राहणाऱ्या जागा आणि प्रवेश फेरीची प्रक्रिया लवकर पूर्ण होण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात येत असल्याचे संचालनालयाकडून सांगण्यात आले.

प्रवेश प्रक्रिया विद्यार्थिभिमुख होण्यासाठी त्यात गेल्या वर्षी बदल करण्यात आले. विद्यार्थ्यांना त्यांच्या मनासारखे महाविद्यालय मिळावे म्हणून या प्रक्रियेत फ्रिज, फ्लोट, स्लाइड असे पर्याय होते. विद्यार्थ्याने दिलेल्या पहिल्या पसंतीचे महाविद्यालय घेण्याची त्याला सक्ती आहे. परंतु त्या पुढील पसंतीक्रमाचे महाविद्यालय मिळाले आणि ते नको असल्यास त्याला फ्लोट, स्लाइड हे पर्याय निवडता येतात.

तंत्र शिक्षण संचालनालयाने केलेल्या या बदलानंतर विद्यार्थ्यांना त्याचा फार फायदा झाला नाही. त्यामुळे या वर्षी प्रवेश प्रक्रिया लवकर पूर्ण करण्यासाठी एक फेरी कमी करण्यात येत आहे. यामुळे महाविद्यालयेदेखील लवकर सुरू होतील, असा अंदाज तंत्र शिक्षण संचालनालयाचा आहे. तंत्र शिक्षण संचालक डॉ. सुभाष महाजन म्हणाले, ""विद्यार्थ्यांनी पसंतीक्रम भरल्यानंतर ते चौथ्या फेरीपर्यंत बदलता येत नव्हते. एका फेरीत वेळही जात होता. आता प्रवेश प्रक्रिया प्रभावीपणे करून ती लवकर पूर्ण करण्यासाठी या वर्षी एक प्रवेश फेरी कमी करण्याचा विचार आहे. परंतु त्यासंबंधी निर्णय पुढील आठवड्यात जाहीर करण्यात येईल.''

Web Title: three rounds of admission in engineering?